Asia Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर 4 सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारताला पुढील दोन्ही सामन्यात विजय मिळवणं अनिवार्य आहे. अन्यथा भारताला आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावं लागणार आहे. भारत आज श्रीलंकेशी सुपर 4 स्पर्धेतील दुसरा सामना खेळणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. भारतासाठी अतिशय महत्वाचा असलेल्या या सामन्यापूर्वी श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकानं भारताला सतर्कतेचा इशारा दिलाय.
दासून शनाका काय म्हणाला?
"भारतीय संघातून कोण येतंय? यानं काहीच फरक पडत नाही. भारताला आयपीएलसह जगभरात क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे. भारताकडं कोणत्याही देशाला पराभूत करण्याची क्षमता आहे. पण आम्ही देखील चांगली तयारी केली आहे. तसेच भारतीय संघाला कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करू."
पाकिस्तान, श्रीलंका गुणतालिकेत अव्वल
आशिया चषकाच्या गट सामन्यात दमदार प्रदर्शन करत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या चार संघांनी आशिया कपच्या सुपर-4 फेरीत प्रवेश केला. ज्यात श्रीलंका आणि पाकिस्ताननं आपपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर, भारत आणि अफगाणिस्तानच्या संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावा लागलं. पाकिस्तान आणि श्रीलंका गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर, भारत आणि अफगाणिस्तानचा संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे. आशिया चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी एका संघाला तीन पैकी दोन सामने जिंकणं अनिवार्य आहे.
भारताचा संभाव्य संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
श्रीलंकेचा संभाव्य संघ:
पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), चरित असलंका, दानुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शानाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश थेक्षाना/प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका.
आशिया चषकात कोणता संघ सर्वाधिक वेळा चॅम्पियन?
आशिया चषक पहिल्यांदा 1984 मध्ये आयोजित करण्यात आला होता. भारतानं सर्वाधिक सात वेळा आशिया चषकाचा खिताब जिंकलाय. तर, दुसरा यशस्वी संघ श्रीलंका आहे. जे पाच वेळा चॅम्पियन ठरले आहेत. पाकिस्ताननं दोन वेळा आशिया चषक स्पर्धा जिंकली आहे. भारत एकमेव संघ आहे, ज्याने आशिया चषकाच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये खिताब जिंकलाय.
हे देखील वाचा-