IND vs PAK Asia Cup 2022: आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा (IND vs PAK) पाच विकेट्सनं पराभव करून स्पर्धेची विजयी सुरुवात केलीय. तसेच इंग्लंडमध्ये गेल्या वर्षी खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकातील पराभवाचा बदलाही घेतला. दरम्यान, जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भुनवेश्वर कुमारनं  (Bhuvneshwar Kumar) भारतीय गोलंदाजीची जबाबदारी चांगल्या पद्धतीनं हाताळली. या सामन्यात भुवनेश्वर कुमारनं चार विकेट्स घेतल्या. या कामगिरीसह त्यानं पाकिस्तानविरुद्ध खास विक्रमाला गवसणी घातलीय.

पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी
भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजीनं पाकिस्तानच्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं. त्यानं  आपल्या स्पेलमध्ये 26 धावा खर्च करून पाकिस्तानच्या चार फलंदाजाला पव्हेलियनचा रस्ता दाखवत भारताच्या विजयाचा पाया रचला . त्यानं पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, आसिफ अली, शादाब खान आणि नसीम शाह यांना बाद केलं.  या दमदार गोलंदाजीनंतर तो पाकिस्तानविरुद्ध टी20 मध्ये भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी करणारा गोलंदाज बनला आहे.

पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट्स
भुवनेश्वर कुमारनं आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध चार विकेट घेतल्या. या कामगिरीसह तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरलाय. त्यानं पाकिस्तानविरुद्ध 5 डावात 9 विकेट घेतल्या आहेत. हार्दिक पांड्या दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यानं पाकिस्तानविरुद्ध 3 डावात 7 विकेट घेतल्या आहेत.

पाकिस्तानविरुद्ध टी-20 सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज-

क्रमांक भारतीय गोलंदाज डाव विकेट्स
1 भुवनेश्वर कुमार 5 9
2 हार्दिक पांड्या 3 7
3 इरफान पठाण 3 6
4 अशोक डिंडा 2 4

भुवनेश्वर कुमारची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
भुवनेश्वर कुमारनं आतापर्यंत भारतासाठी 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 72 टी-20 सामने खेळले आहेत. त्यानं  कसोटी क्रिकेटमध्ये 63 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 141 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय, टी-20 मध्ये त्याच्या नावावर 73 विकेट्सची नोंद आहे.

हे देखील वाचा-