Asia Cup 2022: यूईएमध्ये खेळल्या जाणाऱ्या आशिया चषकाला आजपासून (27 ऑगस्ट) सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (28 ऑगस्ट) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) ऐकमेकांशी भिडणार आहेत. या स्पर्धेत सर्वांच्या नजरा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्याकडं असतील. टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा टप्पा गाठण्यापासून बाबर आझम 120 धावा दूर आहे.
बाबर आझमनं आतापर्यंत 219 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 45.28 च्या सरासरीनं आणि 128 च्या स्ट्राईक रेटनं 7 हजार 880 धावा केल्या आहेत. ज्यात सहा शतक आणि 67 अर्धशतकांचा समावेश आहे. पाकिस्तानकडून फक्त शोएब मलिकला टी-20 मध्ये 8000 धावांचा टप्पा गाठता आलाय.
मोहम्मद रिझवानकडं टी-20 मध्ये 5000 धावा करण्याची संधी
बाबर आझम व्यतिरिक्त मोहम्मद रिझवानकडंही टी-20 क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठण्याची संधी आहे. रिझवाननं आतापर्यंत 187 टी-20 सामन्यात 41.95 च्या सरासरीनं 4 हजार 909 धावा केल्या आहेत. टी-20 क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा गाठल्यास मोहम्मद रिझवान शोएब मलिक, बाबर आझम, मोहम्मद हाफिज, उमर अकमल, अहमद शहजाद आणि कामरान अकमल यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवेल.
ख्रिस गेल टी-20 क्रिकेटचा बादशाह
टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडीजचा स्टार फलंदाज ख्रिसच्या नावावर आहे. ख्रिस गेलनं आतापर्यंत 463 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यात 36.22 च्या सरासरीनं 14 हजार 562 धावा केल्या आहेत. ज्यात 22 शतक आणि 88 अर्धशतकांचा समावेश आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डनं 604 टी-20 सामन्यात 11 हजार 783 धावा केल्या आहेत.
सहा संघात रंगणार आशिया चषकाची स्पर्धा
आशिया कप 2022 स्पर्धेचे सामने टी20 फॉर्मेटमध्ये खेळवले जाणार आहेत. यंदा सामन्यांचा विचार करता आधी ग्रुप स्टेमधील सामने आणि त्यानंतर राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. तर आता आशिया कपचा पहिला सामना 27 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका असा होणार आहे. यावेळी ग्रुप स्टेजचे सामने 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत खेळवले जातील. यामध्ये भारत आपला एक सामना 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध तर दुसरा 31 ऑगस्टला हाँगकाँगविरुद्ध खेळेल. दुसरीकडे ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेंकाविरुद्ध भिडतील. आता ग्रुप स्टेजमध्ये टॉप 2 वर असणारे प्रत्येकी दोन-दोन संघ सुपर 4 मध्ये जातील. ग्रुप स्टेजनंतर सुपर 4 मध्ये आलेले चारही संघ राऊंड रॉबिन फॉर्मेटमध्ये इतर तीन संघासोबत एक-एक सामना खेळतील. सुपर 4 चे सामने संपल्यानंतर गुणतालिकेतील टॉप 2 संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरणार आहेत.
हे देखील वाचा-