Asia Cup 2022, PAK vs AFG : आशिया कप (Asia Cup 2022) स्पर्धेत बुधवारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान (PAK vs AFG) असा रोमांचक सामना पाहायला मिळाला. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एक गडी राखून विजय मिळवला. यानंतर स्टेडिअममध्ये अफगाणिस्तानी चाहत्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. अफगाणिस्तानी चाहते पराभवानंतर प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. संतप्त अफगाणिस्तानी चाहत्यांनी स्टेडिअममध्येच तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्याशिवाय पाकिस्तानी चाहत्यांवर खुर्च्या फेकून त्यांनी मारहाणही केली. यानंतर पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानी प्रेक्षकांमध्ये मारहाण झाली. या मारहाणीचे तसेच स्टेडिअममधील गोंधळाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई येथील शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये बुधवारी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना पार पडला. शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी 11 रनची गरज होती, यावेळी पाकिस्तानकडे एकच विकेट शिल्लक होती. तेव्हा नसीम शाहने दोन चेंडूंवर दोन षटकार काढत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. या पराभवामुळे अफगाणिस्तानचा संघ अंतिम सामन्याच्या लढतीतून बाहेर पडला. यामुळे अफगाणिस्तानी चाहते नाराज झाले आणि त्यांनी स्टेडिअममध्ये गोंधळ घातला. 






पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली आणि अफगाण गोलंदाज फरीद अहमद यांच्यात 19व्या षटकात भांडण झाल्यानंतरच स्टेडियममध्ये पाकिस्तानी आणि अफगाणी प्रेक्षकांमधील वाद वाढू लागल्याचं पाहायला मिळालं. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर फरीदने आसिफची विकेट घेतली. यानंतर सेलिब्रेशन करताना फरीद आसिफपर्यंत पोहोचला. इकडे आसिफने त्याला बॅट दाखवली. यानंतर स्टेडियममध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर नसीम शाहने दोन षटकार मारत मॅच काढली. त्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणी चाहत्यांमध्ये स्टेडिअममध्ये हाणामारी झाली.


'अफगाणी खेळाडूं आणि चाहत्यांना शिकण्याची गरज'


दरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटरटू शोएब अख्तर यानं या घटनेवर टीका करत अफगाणिस्तानवर निशाणा साधला आहे. त्यानं ट्विट केलंय की, 'अफगाणचे चाहते हेच करत आहेत. त्यांनी मागील अनेक वेळा हेच केलं आहे. हा एक खेळ आहे. खेळीमेळीच्या आणि चांगल्या भावनेनं खेळला जावा. जर तुम्हाला खेळात प्रगती करायची असेल तर अफगाणी चाहते आणि तुमचे खेळाडू या दोघांना काही गोष्टी शिकण्याची गरज आहे.'