दुबई: आशिया चषकात शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने बलाढ्य भारताला बरोबरीत रोखलं. आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारणारी टीम इंडिया सुपर फोरमधल्या अखेरच्या साखळी सामन्यात पराभवाच्या तडाख्यातून बालंबाल बचावली. अफगाणिस्ताननं धोनीच्या टीम इंडियाविरुद्धचा हा सामना टाय करून खरोखरच कमाल केली. या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूंवर केवळ एका धावेची गरज होती.
रवींद्र जाडेजा आणि खलील अहमद यांनी 49.4 षटकांत भारताला बरोबरी साधून दिली. पण राशिद खानच्या पुढच्याच चेंडूवर जाडेजानं मिडविकेटला नजीबुल्लाह झादरानच्या हाती झेल दिला आणि सामना टाय झाला. भारताच्या वन डे इतिहासातला हा आठवा टाय सामना ठरला.
त्याआधी, अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शहजादनं भारताच्या बदली गोलंदाजांना अक्षरश: बुकलून काढलं. त्यानं 116 चेंडूंत अकरा चौकार आणि सात षटकारांसह 124 धावांची खेळी उभारली. शहजादनं वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं हे पाचवं शतक ठरलं. शहजादला समोरच्या एंडनं मोहम्मद नबीनं दमदार साथ दिली. त्यानं 56 चेंडूंत तीन चौकार आणि चार षटकारांसह 64 धावांची खेळी केली. त्यामुळं अफगाणिस्तानला 50 षटकांत आठ बाद 252 धावांची मजल मारता आली होती.
अफगाणिस्तानच्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर अंबाती रायुडू आणि के एल राहुल यांनी दमदार सुरुवात केली. रायुडूने 57 तर राहुलने 60 धावा केल्या. रायुडूने 4 चौकार आणि 4 षटकार ठोकले, तर राहुलनेही 5 चौकार आणि 1 षटकार मारले. मात्र एक चुकीचा फटका खेळून राहुलने विकेट फेकली.
त्यानंतर दिनेश कार्तिकने 44 धावांची खेळी करत भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण त्याला दुसऱ्या बाजूने कोणाची साथ लाभली नाही. कर्णधार महेंद्रसिंह धोनी 8, मनीष पांडे 8, केदार जाधव 19, दीपक चहर 12, कुलदीप यादव 9 असे एकामागे एक फलंदाज माघारी परतले.
शवेटच्या षटकात रवींद्र जाडेजा भारताला विजय मिळवून देईल अशी आशा होती. मात्र राशिद खानने त्याला बाद करुन टीम इंडियाला झटका दिला.
धोनीच्या नेतृत्वाखाली सर जाडेजाच्या गुणवत्तेला बहर येतो आणि तो त्यांच्या संघाला सामना जिंकून देतो असा खरं तर आजवरचा अनुभव. मग मैदान आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं असो किंवा आयपीएलचं. पण आशिया चषकातल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सर जाडेजाच्या त्या लौकिकाला गालबोट लागलं. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्त्व करणाऱ्या धोनीला तो हा सामना जिंकून देऊ शकला नाही.
संबंधित बातम्या
दोन वर्षांनंतर धोनी पुन्हा कर्णधार, रोहितला विश्रांती
अफगाणिस्तानचं भारताला 253 धावांचं आव्हान
ऑलिम्पिकसाठी दहा षटकांचे क्रिकेट सामने हवे : अक्रम
अफगाणिस्तानची जबरदस्त कामगिरी, भारताविरुद्धचा सामना टाय!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Sep 2018 07:48 AM (IST)
या सामन्यात अफगाणिस्ताननं भारताला विजयासाठी 253 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाला विजयासाठी अखेरच्या दोन चेंडूंवर केवळ एका धावेची गरज होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -