'हॉर्न ओके..' सिनेमाच्या एका स्पेशल गाण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यावेळी नाना पाटेकरांनी मला बाहुपाशात घेतलं. कोरिओग्राफर्सना दूर व्हायला सांगून डान्स कसा करावा, हे ते दाखवत होते, असं तनुश्रीने सांगितलं. 'झूम टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने हा आरोप केला आहे.
तो 'सोलो' डान्स असल्याचं काँट्रॅक्टमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतानाही त्यांना माझ्यासोबत इन्टिमेट सीन करायचा होता. मी इतकी अनकम्फर्टेबल झाले, की अखेर मी ते गाणं न करण्याचा निर्णय घेतला. तो अनुभव आठवून मी आजही दचकते, असं तनुश्री सांगते.
गेल्या काही महिन्यांपासून अनेक बॉलिवूड कलाकार इंडस्ट्रीतील लैंगिक अत्याचाराचे अनुभव सांगत आहेत. राधिका आपटे, रिचा चढ्ढा, स्वरा भास्कर, कोंकोना सेन शर्मा यांच्यानंतर तनुश्रीने आपली आपबिती सांगितली. #MeToo चळवळ हॉलिवूडमध्ये दोन वर्षांपूर्वी सुरु झाली तरी दहा वर्षांपूर्वी आपण अत्याचाराविरोधात आवाज उठवल्याचं ती म्हणते.
चित्रपटसृष्टीच्या दुतोंडीपणाचा मला वैताग आला. नाना पाटेकरांनी सर्वांसमोर माझ्याशी गैरवर्तन केलं, तरी ते आजही बॉलिवूडमध्ये काम करत आहेत, या गोष्टीची तनुश्रीने चीड व्यक्त केली.
2003 साली फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकल्यानंतर तनुश्रीने 2005 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'आशिक बनाया आपने' हा सिनेमा गाजल्यानंतर तिने चॉकलेट, ढोल, रिस्क, स्पीडसारखे काही सिनेमे केले. 2010 नंतर मात्र ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. पण तिने यापूर्वीही नाना पाटेकरांबाबत घडलेला हा किस्सा अनेकवेळा सांगितला आहे.