दुबई : टीम इंडियानं हाँगकाँगवर 26 धावांनी मात करून, आशिया चषकात विजयी सलामी दिली. या विजयासाठी हाँगकाँगनं भारतीय संघाला संघर्ष करायला लावला.


या सामन्यात भारतानं हाँगकाँगला विजयासाठी 286 धावांचं कठीण आव्हान दिलं होतं. पण हाँगकाँगच्या नजाकत खान आणि अंशुमन रथनं 34 षटकांत 174 सलामी देऊन, भारतीय गोलंदाजांना घाम फोडला.

अखेर कुलदीप यादवनं रथला आणि खलिल अहमदनं नजाकतला लागोपाठच्या षटकात माघारी धाडून सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर हाँगकाँगला 50 षटकांत आठ बाद 259 धावांचीच मजल मारता आली.

भारताकडून खलील अहमदनं वन डे पदार्पणात तीन विकेट्स काढून सामना गाजवला. यजुवेंद्र चहलनं तीन, तर कुलदीप यादवनं दोन फलंदाजांना माघारी धाडलं.

आता सामना पाकिस्तानशी!

टीम इंडियानं हाँगकाँगला हरवून आशिया चषकात विजयी सलामी दिली. या स्पर्धेतल्या दुसऱ्या साखळी सामन्यात भारताचा मुकाबला आज पाकिस्तानशी होईल. टीम इंडियाच्या दृष्टीनं आव्हानात्मक बाब म्हणजे हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यानंतर केवळ सोळा तासांत पाकिस्तानचा मुकाबला करावा लागणार आहे.

आशिया चषकातल्या साखळी सामन्याच्या निमित्तानं उभय संघ सव्वा वर्षांनी पुन्हा आमने-सामने येत आहेत. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं टीम इंडियाचा धुव्वा उडवला होता. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय संघ नक्कीच उत्सुक असेल. आशिया चषकात आजवर भारत आणि पाकिस्तान संघांत ११ सामने झाले आहेत. भारत आणि पाकिस्ताननं त्यापैकी पाच-पाच सामने जिंकले आहेत.