नवी मुंबई : पावसाने पाठ फिरवली असतानाही शेतकरी कसाबसा पीक जगवत आहे. पण व्यापाऱ्यांकडून मात्र शेतकऱ्यांची पिळवणूक सुरुच आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये मराठवाड्यातून आलेल्या 60 ते 70 शेतकऱ्यांचा मोसंबीचा माल पड्या दरात घेणाऱ्या व्यापाऱ्यांचा डाव शेतकऱ्यांनी हाणूण पाडला आहे.


बाजार समितीच्या नियमानुसार किलोप्रमाणे भाव देण्याची पद्धत आहे. पण व्यापाऱ्यांनी पेटीतून सुट्टा माल घेत पैसे दिले आणि त्यातूनही 10 टक्के कपात केली. या व्यापाऱ्यांवर कारवाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मोसंबी, संत्र्यांचे व्यवहार बंद पाडले.



मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीडमधून आपला शेतीमाल घेऊन शेतकरी नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये आले. औरंगाबादमध्ये मोसंबी, संत्री यांना चांगली किंमत मिळत नसल्याचे वाशीतील एपीएमसीमध्ये दरात वाढ होईल या आशेने शेतकऱ्यांनी थेट मुंबईचं प्रवेशद्वार गाठलं.



60 ते 70 गाड्या भरुन आलेला माल विकण्याचा प्रयत्न केला असता एपीएमसीमधील होलसेल व्यापारी वर्गाकडून शेतकऱ्यांची घोर निराशा झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार शेतकऱ्यांचा माल घेताना किलो प्रमाणे घेणं बंधनकारक आहे. पण व्यापारी येथील होलसेल पाटीचं प्रमाण लावून डझनावारी माल घेत होते.

पाटीवर किंमत ठरवली जात असल्याने याचं शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागत आहे. योग्य किंमत हाती येत नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. किलोला भाव मिळाल्यास तीप्पट ते चौपट फायदा शेतकऱ्यांच्या झोळीत पडणार होता. पण व्यापाऱ्यांनी हा सर्व नफा आपल्या खिशात टाकला. विशेष म्हणजे खरेदी केलेल्या शेती मालाचे पैसे देताना परत एकदा 10 टक्के कमिशन कापलं जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.



पणन विभागाच्या कायद्यानुसार, एपीएमसीमध्ये मालाची समोरासमोर खरेदी करण्याचा नियम आहे. शेतकऱ्यांना त्यांचा माल कोणत्या किंमतीत विकला जात आहे याची माहिती समोरासमोर होण्यासाठी हा कायदा करण्यात आला. मात्र याही कायद्याला फाटा देत व्यापारी वर्गाकडून रूमालाखाली हात धरून किंमत ठरवली जाते. यामुळे शेतमालाला किती किंमत मिळाली याची माहिती मिळत नसून थेट बिल हाती थोपवलं जातं. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.



आपला माल विकताना फसवणूक होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी एपीएमसी प्रशासनाकडे केली आहे. शेतकऱ्यांचा माल न विकणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत एपीएमसी प्रशासनाने दिले आहेत. नियमाला बगल देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस दिली जाणार आहे.