पणजी : सध्या सरकार अस्तित्वात असून नसल्यासारखे आहे. सरकारमध्ये कोणाचा पायपोस कोणाला नाही. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्या. त्यासाठी एका दिवसाचे अधिवेशन बोलवा, आम्ही त्यात बहुमत सिद्ध करून दाखवू, अशी भूमिका काँग्रेसच्या 15 आमदारांनी आज सायंकाळी राज्यापालांची भेट घेऊन केली.


सरकार अस्थिर असून प्रशासन ठप्प झाले असल्याने भाजपने विधानसभा विसर्जित करण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न केल्यास तो मान्य करू नये. भाजपला सरकार चालवता येत नसेल, तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थानपनेची संधी द्या. आम्ही सभागृहात बहुमत सिद्ध करून दाखवू, असे काँग्रेसच्या वतीने राज्यपालांना सांगण्यात आले.

राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते कवळेकर म्हणाले, “भाजप आघाडी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. जो तो नेता बनण्याची स्वप्न बघू लागला आहे. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे. भाजप अशावेळी विधासभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकांनी आम्हाला 5 वर्षांसाठी निवडून दिले आहे. भाजपला सरकार चालवायला जमत नसेल, तर सर्वात मोठा पक्ष म्हणून आम्हाला सत्ता स्थापनेची संधी द्यावी.” अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.

येत्या 2 ते 3 दिवसात परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्याला कळवले जाईल, असे राज्यपालांनी आम्हाला सांगितले आहे.

भाजपने निरीक्षक पाठवून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या गैरहजेरीत सरकार कसे चालवता येईल, याची पडताळणी करत असताना काल काँग्रेसने विधीमंडळाची बैठक घेऊन विधानसभा बरखास्त करणे किंवा राष्ट्रपती राजवटीसारखे पर्याय भाजपने वापरू नये यासाठी काही घडण्यापूर्वीच राज्यपालांकडे जाऊन आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला. मात्र काल राज्यपाल गोव्याबाहेर असल्याने काँग्रेसने आज त्यांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता. राज्यपालांनी काँग्रेसला भेटण्यासाठी आज सायंकाळचा वेळ दिला होता. आज आलेक्स रेजीनाल्ड वगळता काँग्रेसचे 15 आमदार आज उपस्थित होते. काँग्रेसचे सगळे आमदार एकसंध असून बहुमत सिद्ध करताना काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे हे उघड़ केले जाईल असे सांगून कवळेकर म्हणाले, सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या सोबत कोण कोण आहेत याचे उत्तर देखील योग्य वेळी मिळेल असा दावा कवळेकर यांनी करत पुन्हा एकदा  काँग्रेसचे आव्हान जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे.

काँग्रेसने 21 आमदारांची नावे जाहीर करावीत : भाजप

दरम्यान, काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यासाठी किती आमदार आहेत त्यांची नावे जाहीर करावीत. केवळ पोकळ दावे करून जनतेची दिशाभूल करु नये, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी व्यक्त केली आहे. भाजप आघाडी अभेद्य असून काँग्रेसने आघाडीमधून फुटून कोणी काँग्रेसला सरकार बनवण्यास मदत करतील याची स्वप्ने सुद्धा बघू नये असा सल्ला नाईक यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना दिला आहे.