दुबई : आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आहे. मात्र एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गोलंदाजी करतानाच दुखापतग्रस्त झाला आहे. पाठीत त्रास जाणवल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आलं.

अठराव्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू फेकताच पंड्या खाली कोसळला. यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्याचंही दिसून आलं. फिजिओ मैदानात धावत आले, मात्र पंड्याला वेदना होत असल्याने अखेर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आलं. पंड्याच्या या दुखापतीविषयी अधिक माहिती समजू शकलेली नाही.


पंड्याच्या जागी मनीष पांडे क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला आहे. मनीष पांडेने येताच एक अफलातून झेल घेतला. केदार जाधवच्या गोलंदाजीवर मनीष पांडेने पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमदचा हा झेल घेतला.

जवळपास सव्वा वर्षानंतर भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत सामना होत आहे. भुवनेश्वर कुमारने या सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी पाठवले. डळमळीत झालेल्या पाकिस्तानला शोएब मलिक आणि बाबर आझम यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अगोदर कुलदीप यादव आणि नंतर केदार जाधवने हाणून पाडला.