दुबई : रोहित शर्माच्या टीम इंडियाने पाकिस्तानचा आठ विकेट्सनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या प्राथमिक साखळीत सलग दुसरा विजय साजरा केला. भारताने या विजयासह अ गटात अव्वल स्थान राखलं.
दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवरच्या या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी 163 धावांचं माफक आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने अवघ्या 29 षटकांत ते लक्ष्य गाठून पाकिस्तानची खाशी जिरवली.
रोहित शर्मा आणि शिखर धवनने 86 धावांची भागीदारी रचून भारतीय डावाचा पाया रचला. मग अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिकने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. रोहित शर्माने 39 चेंडूंमध्ये 52, तर शिखर धवनने 54 चेंडूत 46 धावांची खेळी केली.
भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन-तीन विकेटस काढून सर्वात प्रभावी मारा केला. जसप्रीत बुमराने दोन आणि कुलदीप यादवने एक विकेट काढली.
भुवनेश्वरने गोलंदाजीची आक्रमक सुरुवात करत पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. जबरदस्त फॉर्मात असलेल्या फखर जमानला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर इतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणलं.
डळमळीत झालेल्या पाकिस्तानला शोएब मलिक आणि बाबर आझम यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अगोदर कुलदीप यादव आणि नंतर केदार जाधवने हाणून पाडला.
आशिया चषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताने चांगली सुरुवात केली आहे. मात्र एक चिंतेची बाब आहे, ती म्हणजे अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या गोलंदाजी करतानाच दुखापतग्रस्त झाला आहे. पाठीत त्रास जाणवल्यामुळे त्याला स्ट्रेचरवर बाहेर नेण्यात आलं.
अठराव्या षटकात गोलंदाजी करताना चेंडू फेकताच पंड्या खाली कोसळला. यानंतर त्याला प्रचंड वेदना झाल्याचंही दिसून आलं. फिजिओ मैदानात धावत आले, मात्र पंड्याला वेदना होत असल्याने अखेर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानातून बाहेर नेण्यात आलं.
INDvsPAK : भारताचा पाकिस्तानवर आठ विकेट्स राखून एकतर्फी विजय
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Sep 2018 08:17 PM (IST)
या सामन्यात भारताने पाकिस्तानचा अख्खा डाव सर्व बाद 162 असा गुंडाळला होता. भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन-तीन विकेटस काढून सर्वात प्रभावी मारा केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -