दुबई : आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताचा सामना तुलनेनं दुबळ्या बांगलादेश विरुद्ध होणार आहे. मात्र आशिया चषकात बांगलादेशनं पाकिस्तान, श्रीलंका यांसारख्या बलाढ्या संघाना धुळ चारली आहे. त्यामुळे फायनलमधील टीम इंडियाचं आव्हान सोपं नसणार आहे. बांगलादेशचा '6 एम' फॅक्टर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.


बांगलादेशचे  '6 एम' अर्थात मुशफिकुर रहीम, मशरफी मुर्तजा, मेहदी हसन मिराज, मुस्तफिजुर रेहमान, मोहम्मद मिथुन, मेहमुदुल्ला हे भारतीय संघांचा खेळ बिघडवण्याची क्षमता ठेवतात. या सहा खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आपली झलक दाखवली आहे.


बांगलादेश संघासाठीच्या 'करो या मरो'च्या सामन्यात या सहा खेळाडूंनी आपल्या कामगिरीच्या जोरावर पाकिस्तानचा धुव्वा उडवला. या सहा खेळाडूंमधील चार खेळाडूंनी यापूर्वीही भारताच्या अडचणी वाढवल्या होत्या. त्यात आता मेहदी हसन मिराज, मोहम्मद मिथुन या दोन खेळाडूंची भर पडली आहे.


त्यामुळे पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाच्या तुलनेत कमकुवत असलेला बांगलादेश जरी आशिया चषकाच्या फायनलमध्ये असला तरी टीम इंडिया त्यांना दुबळं समजण्याची चूक करणार नाही.


रोहित शर्माची टीम इंडिया आशियाई क्रिकेटवरचं आपलं वर्चस्व दाखवून देण्यासाठी उद्या दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवर दाखल होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी पाच वाजता या सामन्याला सुरुवात होईल. टीम इंडियानं प्राथमिक साखळीत दोन आणि सुपर फोर साखळीत तीन विजय मिळवून निर्विवादरित्या अंतिम फेरीत धडक मारली.


बांगलादेशला गटात अफगाणिस्तानकडून आणि सुपर फोर साखळीत भारताकडून हार स्वीकारावी लागली आहे. पण त्याच बांगलादेशनं पाकिस्तानचा 37 धावांनी पराभव करून अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. त्यामुळे टीम इंडियाला बांगलादेशचं आव्हान कमी लेखता येणार नाही.