पुणे : खडकवासला धरणातून पुणे शहराकडे जाणारा मुठा उजवा कालवा आज दांडेकर पुलाजवळ फुटल्यामुळे सिंहगड रस्त्यावर हाहाकार उडाला. मात्र कालव्याच्या भिंतीला ज्या ठिकाणी भगदाड पडलं, तिथे मातीच्या भिंतीमध्ये केबल टाकण्यात आल्या आहेत. याच केबल्समुळे भिंत खचल्याचं म्हटलं जात आहे.
कालव्याच्या मातीच्या भिंतीमध्ये तब्बल 6 केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यात दोन केबल खासगी कंपन्यांच्या असून काही केबल महावितरणच्या असल्याची माहिती आहे.
कालव्याची भिंत खोदून केबल टाकण्यात आल्याचं दिसत आहे. कालव्याच्या पाण्यापासून अवघ्या तीन ते पाच फुटावर ही केबल आहे. त्यामुळे ही केबल खोदताना कालव्याची भिंत खोदली असावी, आणि त्यामुळेच ही घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.
नेमकी दुर्घटना काय?
पर्वती भागात मुळा कालव्याची भिंत कोसळली. जनता वसाहतीजवळ कॅनॉलची भिंत कोसळल्याने पुण्याच्या रस्त्यांवर महापूर आल्याचं चित्र आहे. दांडेकर पूल आणि परिसरात पाणीच-पाणी साचलं. सिंहगड रोड परिसरात पाणी साचल्याने वाहतूक रखडली. पर्वती टेकडीच्या पायथ्यापासून मोठ्या वेगाने पाणी रस्त्यावर आलं. पाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली.
दांडेकर पूल परिसरात बैठी घरं आहेत. त्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. थेट घरांत पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पाण्याचा प्रवाह खूपच वेगात असल्यामुळे रस्त्यावर आणि घरात अल्पावधीतच गुडघाभर पाणी भरलं.
या कालव्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होतो. मात्र कालव्यातून पाणी अडवण्याची जी भिंत आहे, तीच भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा प्रवाह थेट रस्त्यावर आला. क्षणार्धात रस्त्यावर गुडघाभर पाणी जमा झालं. त्यामुळे नेमकं काय झालंय हे लोकांना कळलंच नाही.