पाकिस्तानचा धुव्वा, बांगलादेशची फायनलमध्ये धडक
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2018 08:09 AM (IST)
बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली.
दुबई: बांगलादेशने पाकिस्तानचा 37 धावांनी धुव्वा उडवून, आशिया चषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळं शुक्रवारी (उद्या) फायनलमध्ये आता भारत विरुद्ध बांगलादेश असा सामना पाहायला मिळेल. या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानला 240 धावांचं माफक लक्ष्य दिलं होतं. पण इमाम उल हकच्या 83 धावांच्या झुंजार खेळीचा अपवाद वगळता, पाकिस्तानच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. इमामने शोएब मलिकच्या साथीनं 67 धावांची आणि असिफ अलीच्या साथीनं 71 धावांची भागीदारी रचली. पण या दोन्ही भागीदारी पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. पाकिस्तानला 50 षटकात 9 बाद 202 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुस्ताफिजूर रहमाननं पाकिस्तानच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं. या सामन्यात टॉस जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 239 धावा केल्या. बांगलादेशने 12 धावांतच तीन विकेट गमावल्या होत्या. सौम्या सरकार (0), मोमिनुल हक (5) आणि लिटन दास (6) धावा करुन माघारी परतले. मात्र मुश्फीकूर रहीमने 99, तर मोहम्मद मिथूनने 60 धावा केल्याने बांगलादेशला 239 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून जुनैद खानने सर्वाधिक चार तर शाहीन आणि हसन अलीने दोन-दोन विकेट घेतल्या. त्यानंतर बांगलादेशने दिलेल्या 240 धावांचं लक्ष्य घेऊन पाकिस्तानचे सलामीवीर मैदानात उतरले. मात्र सलामीवीर इमाम उल हक (83) शिवाय अन्य कोणत्या खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानने पहिल्या तीन विकेट केवळ 18 धावांत गमावल्या. फखर जमान (1), बाबर आझम (1) आणि सरफराज अहमद (10) हे स्वस्तात माघारी परतल्याने पाकिस्तान संघ संकटात सापडला. मात्र इमामच्या साथीला आलेल्या अनुभवी शोएब मलिकने (30) काही काळ विकेट तटवून ठेवली. मात्र बांगलादेशचा कर्णधार मुर्तझाने रुबेलच्या गोलंदाजीवर मलिकचा झेल टीपत त्याला माघारी धाडलं. त्यानंतर पाकिस्तानचा कोणताच फलंदाज टिकू शकला नाही. परिणामी पाकला बांगलादेशने दिलेलं लक्ष्य गाठता न आल्याने, त्यांना आशिया चषकातून गाशा गुंडाळावा लागला. दरम्यान, आशिया चषकाचा अंतिम सामना उद्या भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. आशियाचा किंग कोण, हे उद्याच समजेल.