पाटणा : बिहारमध्ये काँग्रेसकडून लावण्यात आलेलं बॅनर सध्या टीकेचं निमित्त ठरलं आहे. या बॅनरवर काँग्रेस नेत्यांचे फोटो छापून, त्यावर त्यांच्या जाती लिहिण्यात आल्या आहेत. ‘सामाजिक समरसता’ या गोड गोंडस मथळ्याखाली हे बॅनर छापण्यात आलेत. पाटण्यातील इन्कम टॅक्स चौकात हे बॅनर लावण्यात आलेत.

बिहार राज्यातील कार्यकारिणीत काँग्रेसने मोठे बदल केले. अनेक नव्या नेत्यांना महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. यात विविध समाजातील व्यक्तींचा समावेश करण्यात आलाय.

आपण किती ‘सर्वधर्म-जात समभाव’ मानतो, हे दाखवण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी चक्क या नव्या कार्यकारिणीतील नेत्यांच्या जाती शोधून, त्यांचं ओंगळवाणं प्रदर्शन मांडलंय. त्यावर त्यांचे फोटो छापलेच, सोबत जातीही लिहिल्यात.

“नव नियुक्त बिहार काँग्रेस कार्य समिती में सामाजिक समरसता की मिसाल कायम” असा मथळा छापत हे बॅनर लावण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, या बॅनरवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा फोटो छापून त्यावरही ‘ब्राह्मण समुदाय’ असे लिहिले आहे.

एकीकडे समानतेची हाक द्यायची आणि दुसरीकडे विषमतेची बिजं पेरणाऱ्या जातींचं ओंगळवाणं प्रदर्शन करायचं, अशा दुटप्पी भूमिकेत बिहार काँग्रेस वावरत असल्याचेच या बॅनरवरुन दिसून येतेय. शिवाय, बिहारमधील राजकारण जातींच्या भोवती किती गिरक्या घालतं, हेही यातून समोर येतं.