दुबई : आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला 137 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशने पहिली फलंदाजी करत श्रीलंकेला 262 धावाचं लक्ष दिलं होतं. मात्र बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाचा निभाव लागला नाही आणि अवघ्या 124 धावांत श्रीलंकेचा संघ ऑल आऊट झाला.
बांगलादेशच्या जलद आणि फिरकीपटू गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या खेळाडूंना खेळपट्टीवर टीकूच दिलं नाही. आठव्या स्थानी खेळायला आलेल्या दिलरुवान परेराने श्रीलंकेकडून सर्वाधिक 29 धावा केल्या, तर सलामीला आलेल्या उपुल थरगाने 27 धावा केल्या. लंकेच्या सहा फलंदाजांना तर दुहेरी आकडही गाठता आला नाही. त्यामुळे बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी अवस्था केविलवाणी झाली होती.
बांगलादेशकडून कर्णधार मशरफे मोर्तजा, मेहंदी हसन आणि मुस्तफिकूर रहमान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर रुबेल हुसेन, मोसद्दक हुसेन आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
बांगलादेशने प्रथम फलंदाजी मुश्फीकुर रहीमच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर 262 धावांचं आव्हान श्रीलंकेपुढे ठेवलं. मुश्फीकुर रहीमने 150 चेंडूत 144 धावा ठोकत श्रीलंकेसमोर एक कडवं आव्हान उभं केलं. श्रीलंकेच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा फायदाही बांगलादेशला झाला, सामन्यात श्रीलंकेने अनेक कॅच सोडल्या.
मुश्फीकुरने तिसऱ्या विकेटसाठी मोहम्मद मिथुनच्या मदतीने 132 धावांची भागिदारी केली. मिथुनने 63 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत मुश्फीकुरला उत्तम साथ दिली. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने चार विकेट घेतल्या, तर धनंजय डी सिल्वाने दोन विकेट घेतल्या. सुरंगा लकमल, अमिला अपोंसो आणि थिसारा परेराला प्रत्येकी एक विकेट मिळाली.