दुबई : आशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा 137 धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. पहिल्या सामन्यातील विजयामुळे बांगलादेश संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडलेल्या मुश्फीकुर रहिमने एक विक्रम आपल्या नावे केला आहे. शतरवीर मुश्फीकुर रहिमने या विक्रमामुळे धोनी आणि संगकारासारख्या दिग्गजांना मागे टाकलं आहे.
मुश्फीकुर रहिमने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात 150 चेंडूत 144 धावा ठोकल्या. आशिया चषकाच्या इतिहासातील ही दुसरी सर्वोत्तम खेळी आहे. तर आशिया चषकात एखाद्या विकेटकीपरने ठोकलेली ही सर्वाधिक धावसंख्या आहे.
श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराला मागे सोडत मुश्फीकुरने या विक्रमाला गवसणी घातली आहे. याआधी आशिया चषकात विकेटकीपर म्हणून सर्वाधिक धावसंख्या कुमार संगकाराच्या नावे होती. संगकाराने बांगलादेशविरोधात 2008मध्ये 121 धावा केल्या होत्या.
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आशिया चषकातील सर्वाधिक धावसंख्या 109 आहे. त्यामुळे धोनीच्या आशिया चषकातील कामगिरीकडे भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असतील.
पहिल्या सामन्यात बांगलादेशने पहिली फलंदाजी करत श्रीलंकेला 262 धावाचं लक्ष दिलं होतं. मात्र बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाचा निभाव लागला नाही आणि अवघ्या 124 धावांत श्रीलंकेचा संघ ऑल आऊट झाला.
संबधित बातम्या