मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्रो' आज व्यावसायिक उपग्रह अवकाशात सोडणार आहे. दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही (पोलर सॅटेलाईट लाँच वेहिकल) सी 42 श्रीहरिकोटामधून अंतराळात झेपावणार आहे.


श्रीहरिकोटातील सतीश धवन स्पेस सेंटरमधून आज (16 सप्टेंबर) रात्री दहा वाजून 8 मिनिटांनी हे प्रक्षेपण होणार आहे. पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी हे उपग्रह पाठवले जाणार असून यामध्ये यूकेच्या दोन उपग्रहांचा समावेश आहे. त्यांचं एकत्रित वजन 889 किलो आहे.

एकाही भारतीय सॅटेलाईटचं प्रक्षेपण यावेळी होणार नाही. हे सॅटेलाईट प्रक्षेपण पूर्णत: व्यावसायिक असल्याची माहिती 'इस्रो'चे प्रमुख के. शिवन यांनी दिली आहे.

यापूर्वी एप्रिल 2013 मध्ये इस्रोच्या पीएसएलव्ही सीए लाँच वेहिकलने इटलीच्या सॅटेलाईटला अंतराळात पाठवण्यात आलं होतं. तर जुलै 2015 मध्ये ब्रिटनच्या पाच उपग्रहांचं इस्रोनं यशस्वी उड्डाण केलं होतं.