शाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे का येतात? : जावडेकर
एबीपी माझा वेब टीम | 16 Sep 2018 08:12 AM (IST)
शाळा नेहमी भीकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारात येतात. अरे, मदत तर तुमच्या घरातच पडलेली आहे, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.
पुणे : शाळांनी भीकेचा कटोरा घेऊन नेहमी सरकारकडे येण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक सहाय्य मागावं, असं वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. जावडेकरांच्या विधानामुळे सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. जगभरातील अनेक शैक्षणिक संस्था कोण चालवतात? माजी विद्यार्थी. नामांकित विश्वविद्यापीठं कोणामुळे चालतात? माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीमुळेच. जे विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरले आहेत, त्यांनी आपापल्या शाळेला मदत केली आहे. किंबहुना ही माजी विद्यार्थ्यांची जबाबदारीच आहे, असंही जावडेकर म्हणाले. शाळा नेहमी भीकेचा कटोरा घेऊन सरकारच्या दारात येतात. अरे, मदत तर तुमच्या घरातच पडलेली आहे. माजी विद्यार्थी तुमचं देणं लागतात, असं प्रकाश जावडेकर म्हणाले. मात्र जावडेकरांच्या या वक्तव्यामुळे ट्विटरवर नाराजीचा सूर उमटला आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या विकासात माजी विद्यार्थ्यांचा वाटा मोठा आहे. अन्य शाळांसाठी हा आदर्शच आहे. ज्ञानप्रबोधिनीने सुरु केलेली परंपरा इतरांनी चालवावी, अशा भावनाही जावडेकरांनी व्यक्त केल्या.