जोहान्सबर्ग : टीम इंडियाची फिरकीपटू जोडी कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांनी संघात आपलं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळेच फिरकीपटू जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांचा पर्याय म्हणून या दोघांना संघात स्थान देण्यात येत आहे. 2019 चा विश्वचषक पाहता कर्णधार विराट कोहलीही चहल आणि कुलदीपलाच जास्तीत जास्त संधी देत आहे.


ही सर्व परिस्थिती पाहता अश्विन आणि जाडेजासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतो. मात्र टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या वक्तव्यानंतर अश्विन आणि जाडेजाला काहीसा दिलासा मिळू शकतो. या दोघांसाठी विश्वचषकाच्या भारतीय संघाचे दरवाजे अजूनही खुले आहेत, असं भरत अरुण यांनी म्हटलं आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील जोहान्सबर्गमध्ये खेळवण्यात येणाऱ्या चौथ्या वन डेपूर्वी भरत अरुण बोलत होते. खेळपट्टीच्या परिस्थितीवर अवलंबून न राहता कुलदीप आणि चहल गोलंदाजी करतात, असं भरत अरुण म्हणाले.

''कुलदीप आणि चहल सकारात्मक गोलंदाज आहेत. ते चेंडू फ्लाईट करण्यासाठी कधीही घाबरत नाहीत. शिवाय काहीतरी मिळवण्यासाठी चेंडू जास्त स्पिन करायलाही चाचपडत नाहीत आणि खेळपट्टीच्या परिस्थितीवर जास्त अवलंबून न राहता गोलंदाजी करतात,'' असं भरत अरुण यांनी सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सहा सामन्यांच्या वन डे मालिकेत भारत सध्या 3-0 ने आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या तीनही सामन्यांमध्ये या फिरकीपटू जोडीने शानदार कामगिरी केली आहे.

श्रीलंका दौऱ्यानंतर कुलदीप यादव आणि चहलने आतापर्यंत 17 सामन्यांमध्ये 32 विकेट घेतल्या आहेत. या शानदार कामगिरीनंतरही विश्वचषकाच्या संघात अजून जागा बाकी असल्याचं गोलंदाजी प्रशिक्षकांचं म्हणणं आहे.

''भारताकडे गोलंदाजांची चांगली फळी आहे. त्यामुळे प्रत्येक फॉरमॅटमध्ये रोटेशन पॉलिसीचा वापर केला जात आहे. अश्विन आणि जाडेजा वन डे संघात सहभागी होण्याच्या शर्यतीत नाहीत, असं नाही. ते अजूनही भारतीय संघात जागा मिळवू शकतात,'' असं भरत अरुण म्हणाले.