पणजी: दिल्लीच्या प्रदूषणाला कंटाळलेला टीम इंडियाचा माजी गोलंदाज आशिष नेहरा, आता गोवेकर झाला आहे. नेहराने पर्वरी परिसरात एक बंगला भाड्याने घेतला आहे.


गोव्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांच्या शेजारीच हा बंगला आहे.

आयपीएलमध्ये नेहरा रॉयल चँलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाज प्रशिक्षक आहे. आयपीएलचा हंगाम जोमात असतानाही, नेहरा वेळात वेळ काढून टेनंट्स व्हेरीफिकेशन फॉर्म अर्थात भाडेकरु नोंदणी फॉर्म नेण्यासाठी नुकताच पर्वरी पोलिस स्टेशनमध्ये येऊन गेला.

नेहराचे हे फोटो व्हायरल झाले आहेत. नेहराने काही दिवसांपूर्वी टेलीग्राफला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याने दिल्लीबाहेर राहण्यासाठी घर शोधत असल्याचं म्हटलं होतं.

बॉलिवूड कलाकारांसह मोठमोठे व्यावसायिक, उद्योजकांना गोव्यात आपले सेकंड होम असावे, असे वाटत असते. त्यातूनच अनेकांनी इथे फ्लॅट आणि बंगले विकत घेतले आहेत.



भारतीय संघाचा फलंदाज युवराज सिंगने मोरजी येथे बंगला विकत घेतल्याची बातमी काही दिवसापूर्वी आली होती. आता आशिष नेहरा हा देखील गोव्यात स्थायिक होण्याची तयारी करीत आहे. तूर्त तो भाड्याच्या खोलीत राहणार आहे.  म्हणूनच भाडेकरू म्हणून आपली नोंदणी करण्यासाठी सोमवारी त्याने पर्वरी पोलिस स्थानकात हजेरी लावली होती.

गेल्याच महिन्यात टेलीग्राफला दिलेल्या मुलाखतीत आशिष नेहराने गोव्यात स्थायिक होण्याचा इरादा स्पष्ट केला होता. निवृत्तीनंतर आपल्याला कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे. त्यासाठी आपण योग्य जागेची निवड करीत आहे, असं नेहरा म्हणाला होता.

दिल्लीतील प्रदूषणाला कंटाळून तो मुंबईत स्थलांतरीत झाला. परंतु तिथे मन रमेनासे झाल्याने त्याने गोव्याची निवड केली. गोव्यात येऊन पहिल्यांदा त्याने इथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

गोव्यातील वातावरणा त्याला भावले. इथली हिरवळ,समुद्र किनारे आणि विशेष म्हणजे प्रदूषण विरहीत वातावरण आवडल्याने, त्याने इथे राहण्याचा आपला बेत पक्का केला.

त्याच्यासमोर सर्वात प्रथम आपल्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी योग्य शाळा निवडण्याचे आव्हान होते. मुलांच्या शाळेचा प्रश्न सुटल्याने आपले मुख्य काम झालं, असं नेहरा म्हणाला.

गोव्याचे हवामान, हिरवळ,प्रदूषणरहित वातावरण आणि समुद्र किनारे हे निवृत्तीनंतर जगण्याचे एक योग्य ठिकाण आहे, असे आपल्याला वाटले आणि म्हणूनच आपण इथे येण्याचे ठरविले,असं नेहरा म्हणाला.

‘मी एक साधा माणूस आहे. मला फक्त एक शॉर्ट्स, एक टी शर्ट, स्लीपर्स, सनग्लासेस आणि माझे कुटुंब सोबत हवे, असे म्हणणारा नेहरा आता गोव्यातील रस्त्यांवर मोकळ्या हवेत फिरताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.