बंगळुरु: चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने गाजवला.


धोनीनं आधी अंबाती रायुडू आणि मग ड्वेन ब्राव्होच्या साथीनं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या आक्रमणावर चढवलेल्या हल्ल्यानं, चेन्नई सुपर किंग्सला आणखी एक सनसनाटी विजय मिळवून दिला.

चेन्नईनं या सामन्यात बंगलोरवर पाच विकेट्स आणि दोन चेंडू राखून मात केली. या सामन्यात बंगलोरनं चेन्नईला विजयासाठी 206 धावांचं मोठं आव्हान दिलं.

अंबाती रायुडू आणि धोनीनं पाचव्या विकेटसाठी रचलेल्या शतकी भागिदारीनं चेन्नईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. मग धोनी आणि ब्राव्होनं अवघ्या 11 चेंडूंत 32 धावा ठोकून चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

रायुडूनं तीन चौकार आणि आठ षटकारांसह 82 धावांची खेळी उभारली. धोनीनं एक चौकार आणि सात षटकारांसह नाबाद 70, तर ब्राव्होनं नाबाद 14 धावांची खेळी केली.

धोनीची चपळाई

धोनीने काल केवळ फलंदाजीच नव्हे तर आपल्या क्षेत्ररक्षणानेही सर्वांना अचंबित केलं.

बंगळुरुच्या डावात तिसऱ्या षटकात दीपक चाहरने डी कॉकला गोलंदाजी केली. एक चेंडू डी कॉकच्या बॅटला लागून उंच उडाला. त्यावेळी तो चौकारच जाईल असं सर्वांना वाटत होतं.

मात्र उंच उडालेला चेंडू पकडण्यासाठी विकेटकीपर असलेला धोनी सीमारेषेजवळ धावत आला होता. धोनीने बाऊंड्री लाईन ओलांडणारा चेंडू चपळाईने अडवला. शिवाय त्याने दोन धावाही वाचवल्या.

विकेटकीपर असलेला धोनी सीमारेषेजवळ धावत आल्याने, त्याच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक तर झालंच, शिवाय त्याने आपण किती फिट आहोत, हे दाखवून दिलं.

या जबरदस्त फिल्डिंगशिवाय धोनीने कॉलिन डी ग्रँडहोम आणि पवन नेगीला धावबादही केलं.

VIDEO: