नवी दिल्ली : न्यूझीलंडला वन डे मालिकेत पराभवाची धूळ चारल्यानंतर टीम इंडिया टी-20 मालिकेसाठी सज्ज झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धचा पहिला टी-20 सामना दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात खेळवला जाणार आहे. याच मैदानात टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज आशिष नेहरा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे.
आशिष नेहराने यापूर्वीच निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे उद्याचा सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतला अखेरचा सामना असेल. गेल्या 19 वर्षांपासूनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आशिष नेहराचा प्रवास उद्या फिरोजशाह कोटला मैदानावर संपणार आहे.
आशिष नेहरा मोहम्मद अझरुद्दीनपासून ते विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळला आहे. शिवाय महेंद्र सिंह धोनी, राहुल द्रविड, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्त्वातही तो खेळला आहे. विराट कोहली दहा वर्षांचा असताना नेहराने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
नेहराने 2011 च्या विश्वकप विजेत्या आणि 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. नेहराने 19 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली कसोटीत पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 टी-20 सामने खेळले आहेत.