नवी दिल्ली : वयाला केवळ एक आकडा समजून कामगिरीत सातत्य राखणारा भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज आशिष नेहरा पुढच्या महिन्यात निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. नेहराची निवड ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठीही करण्यात आली आहे.
‘अहमदाबाद मिरर’च्या वृत्तानुसार, टी-20 मध्ये नेहराची कामगिरी चांगली राहिली आहे. मात्र त्याने भविष्याबाबत निर्णय घेतला आहे. तो पुढच्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची शक्यता आहे. 38 वर्षीय आशिष नेहरा भारतीय ड्रेसिंग रुममध्ये सध्या सर्वात अनुभवी गोलंदाज आहे.
केवळ आशिष नेहराच नव्हे तर मोठ्या काळापासून संघातून बाहेर असलेले काही दिग्गज खेळाडूही निवृत्तीची घोषणा करणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. मात्र वृत्तपत्राने नेहराशिवाय इतर खेळाडूंच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. टीम इंडियाचा हा टी-20 स्पेशालिस्ट गोलंदाज पुढच्या महिन्यात दिल्लीत होणाऱ्या सामन्यात निवृत्तीची घोषणा करु शकतो, असं या वृत्तात म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. यातील टी-20 सामना 1 नोव्हेंबरला दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानात होणार आहे. हेच मैदान नेहराचं होमग्राऊंडही आहे.
नेहराने 2011 च्या विश्वकप विजेत्या आणि 2003 साली विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. नेहराने 19 वर्षांपूर्वी म्हणजे 1999 साली कसोटीत पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 17 कसोटी, 120 वन डे आणि 26 टी-20 सामने खेळले आहेत.