कोलंबो : श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगानं 2011मधील विश्वचषकाचा अंतिम सामना फिक्स असल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी रणतुंगानं चौकशीची मागणी केली आहे. 2011 साली भारतानं श्रीलंकेवर मात करत 28 वर्षानंतर विश्वचषक पटकावला होता. श्रीलंकेतील इंग्रजी वृत्तपत्र डेली मिररनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

'2009 साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघावर त्यावेळी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळी हा दौरा कुणाच्या सांगण्यावरुन आयोजित झाला होता? याची चौकशी झाली पाहिजे.' असं काही दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा म्हणाला होता.

संगकाराच्या याच मागणीवर रणतुंगा उत्तर म्हणाला की, 'संगकारा पाकिस्तान दौऱ्याबाबत चौकशीची मागणी करत असेल तर ती झाली पाहिजे. पण माझं म्हणणं असं आहे की, 2011 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेसोबत जे झालं त्याचीही चौकशी झाली पाहिजे.'

रणतुंगा पुढे असंही म्हणाला की, 'विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी असलेल्या कॉमेंट्री पॅनलमध्ये मी स्वत: होतो. श्रीलंकेची कामगिरी पाहून मी फारच निराश झालो होतो.'

या अंतिम सामन्यात श्रीलंकेने 274 धावांचं लक्ष्य भारतासमोर ठेवलं होतं. भारतानं ते लक्ष्य सहजपणे पार केलं. सहा गडी राखून भारतानं हा सामना जिंकला.

'मला माहित नाही दिवशी काय झालं होतं, पण एखाद्या दिवशी मी ते सत्य समोर आणेल. माझं म्हणणं आहे की, या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे.' असं रणतुंगा म्हणाला.
रणतुंगा सध्या श्रीलंका सरकारमध्ये पेट्रोलियम मंत्री आहे. एका पेट्रोल निगमच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी त्यानं हे वक्तव्य केलं.