भिवंडी : सततच्या आगीमुळे भिवंडीचं भोपाळ होतंय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण या परिसरातल्या केमिकल कंपन्या सातत्यानं आगीच्या भक्षस्थानी पडत असल्याने भिवंडीतील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

भिवंडीत आज पूर्णा गावातील श्रीराम कंपाऊंडमधल्या रौनक वेअरहाऊस या केमिकल गोदमाला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग इतकी भीषण होती की, त्यावर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाकडून यश आलं असं सांगण्यात येत होतं. पण अद्याप आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं नसल्याचं सांगण्यात येत होतं.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. त्यातच केमिकलमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचीही माहिती आहे.

या आधीही फेब्रुवारीमध्ये एका गोदामाला भीषण आग लागली होती. या आगीत चारजणांचा होरपळून मृत्यू झाला होता. तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. तर 3 मार्च रोजी एका कापडाच्या मिलला भीषण आग लागली होती. 2014 मध्ये तर एका लाकडी गोदामाला लागलेल्या आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

वास्तविक, भिवंडी आणि आसपासच्या परिसरात अनेक केमिकल कंपन्या आहेत. या केमिकल कंपन्यांमध्ये आगीच्या घटना वाढत आहेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासानाची यंत्रणा नाही. आग लागल्यानंतर नेहमी ठाणे, कल्याण, उल्हासनगर आदी भागातून आग्निशमन दलाला पाचारण करावं लागतं.

त्यामुळे पूर्णा, राहनाळ, काल्हेर, कशेळी, वळ, दापोडे आदी भागातील सुमारे 500 हून अधिक कुटुंबांना आपला जीव मुठीत घेऊन जगावं लागतं आहे. शिवाय या परिसरात शाळा आणि रुग्णालयांची संख्याही मोठी आहे. तेव्हा प्रशासनानं वेळीच दक्षता घेतली नाही, तर केमिकल गळतीमुळे मोठी दुर्घटना घटण्याची भीती स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.