मुंबई : भारताच्या अंडर-19 संघाने विश्वचषक जिंकून एक मोठा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला धूळ चारत भारताने मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव सध्या सुरु आहे.

याचवेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील युवा टीमचं खास कौतुक केलं आहे. पवारांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.


'या प्रचंड मोठ्या विजयासाठी टीम इंडियाचं अभिनंदन, तुम्ही चांगले खेळलात! आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!' असं ट्वीट शरद पवारांनी केलं आहे.

दरम्यान, अंडर-19 विश्वचषकावर भारताने चौथ्यांदा नाव कोरलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या 217 धावांचं आव्हान टीम इंडियानं अवघ्या 38.5 षटकातच पूर्ण केलं. मनजोत कालरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात कांगारुंवर तब्बल 8 गडी राखून मात केली. मनजोतनं 101 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या.

भारताने याआधी २०००, २००८ आणि २०१२ साली अंडर नाईन्टिनचा विश्वचषक जिंकला होता.