अनुराग ठाकूर यांची सुप्रीम कोर्टासमोर बिनशर्त माफी!
एबीपी माझा वेब टीम | 06 Mar 2017 11:00 PM (IST)
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयासमोर शपथपूर्वक खोटी साक्ष दिल्याच्या आरोपाप्रकरणी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी बिनशर्त माफी मागितली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीला अनुराग ठाकूर आवर्जून उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयासमोर चुकीची माहिती सादर करण्याचा आपला कोणताही इरादा नव्हता, असं ठाकूर यांनी स्पष्ट केलं. तसंच कोणत्या परिस्थितीत आपण सर्वोच्च न्यायालयाला सदर माहिती दिली, याविषयी त्यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केलं. लोढा समितींच्या शिफारशींनंतर सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकूर यांना पदावरुन हटवलं होतं. तसंच त्यांच्यावर कोर्टात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खटला दाखल केला होता.