'चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तातडीने भारतीय संघ जाहीर करा'
एबीपी माझा वेब टीम | 04 May 2017 05:13 PM (IST)
मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ तातडीनं जाहीर करा, असा आदेश सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या प्रशासकांनी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीत चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आले असून, यात एकूण आठ संघांचा समावेश आहे. भारत वगळता इतर देशांनी आपापली संघनिवड जाहीर केली आहे. प्रशासकीय समितीनं बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी यांना कडक शब्दांत पत्र लिहलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघनिवडीत होणारा उशीर हा भारतीय क्रिकेटच्या प्रतिमेला डागाळणारा असल्याची भावना या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. महसूल वाटपाच्या मुद्द्यावरून आयसीसीसोबत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा संघ अजूनही जाहीर केलेला नाही. हा संघ जाहीर करण्याची अंतिम मुदत 25 एप्रिल होती. बीसीसीआयनं आता कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीचा संघ जाहीर करावा, असा आदेश प्रशासकीय समितीनं दिला आहे. भारतीय संघ जगात सध्या सर्वोत्तम आहे. भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्याऐवजी खेळाडूंच्या मनात गोंधळ आणि साशंकता निर्माण केली जात असल्याचं प्रशासकीय समितीनं या पत्रात नमूद केलं आहे. संबंधित बातम्या :