नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजली उत्पादनांनी भारतीय बाजारपेठेला अक्षरश व्यापून टाकलं आहे. गेल्या वर्षी पतंजलीला 10 हजार 561 कोटींची उलाढाल झाल्याची  माहिती खुद्द रामदेव बाबा यांनी दिली.


देशभरात पतंजलीचे तब्बल 6 हजार वितरक असून त्याची संख्या 12 हजारापर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट पतंजलीसमोर आहे. तसंच हरिद्वारसोबतच जम्मूमध्येही नवा प्लान्ट उभारणार असल्याचं रामदेव बाबांनी सांगितलं. पुढील दोन वर्षात देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनण्याचं लक्ष्य असल्याचं रामदेव बाबा म्हणाले.

यावेळी बाबा रामदेव यांनी सर्व चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं. चीन हा पैसा पाकिस्तानला दहशतवादी कारवाई करण्यासाठी पुरवतो, असा दावा रामदेव बाबांनी केला.

दरम्यान, मागील 5 वर्षात पतंजलीने 100 टक्के वाढीची नोंद केली आहे. शिवाय पतंजलीकडून एका लष्करी शाळेची स्थापनाही केली जाईल. शिवाय पतंजलीच्या पाच उत्पादनांमध्येच गोमूत्राचा समावेश आहे. इतर उत्पादनांमध्ये नाही, असंही रामदेव बाबांनी सांगितलं.