बंगळुरु : टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्या वादावर पहिल्यांदाच मत मांडलं. कुंबळेला ज्या पद्धतीने बाहेर काढण्यात आलं, ते व्हायला नको होतं. त्यात हे सर्व प्रकरण मीडियासमोर येणं आणखी दुर्दैवी असल्याचं तो म्हणाला.


यातलं सत्य काय आहे, ते माहित नसल्यामुळे जास्त बोलणार नाही. मात्र अनिल कुंबळेसोबत हे व्हायला नको होतं. अनिल कुंबळेने भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकून दिले आहेत. प्रशिक्षक म्हणूनही करिअर यशस्वी राहिलं आहे, त्या कुंबळेसोबत असं होणं दुःखद असल्याचं तो ‘क्रिकबझ’शी बोलताना म्हणाला.

खेळणं सोडून तुम्ही ओझं बनता तेव्हा तुम्हाला काढलं जातं. हे वास्तव आहे. भारतीय अंडर 19 संघ आणि भारतीय अ संघाचा प्रशिक्षक म्हणून मलाही एक दिवस जायचंच आहे. काही फुटबॉल मॅनेजर्सना दोन सामन्यांनंतरही काढलं जातं. खेळाडूंना प्रशिक्षकापेक्षा जास्त महत्त्व असतं. कारण आम्ही खेळायचो तेव्हाही आमच्याकडे जास्त ताकद होती, असं द्रविड म्हणाला.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीशी मतभेद झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली.