कोलंबो : झिम्बाब्वेकडून वन डे मालिकेत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूज क्रिकेटच्या तिन्हीही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरुन पायऊतार झाला आहे. झिम्बाब्वेविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या वन डेत श्रीलंकेचा 3 विकेट्सने पराभव झाला.
इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील खराब प्रदर्शनानंतर श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम फोर्ड यांनीही राजीनामा दिला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक निक पाँट्स यांच्यावर प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
अँजेलो मॅथ्यूजने अंडर 19 आणि श्रीलंका अ संघाचंही नेतृत्व केलं आहे. तत्कालीन कर्णधार महेला जयवर्धनेने 2013 मध्ये राजीनामा दिल्यानंतर 25 वर्षीय मॅथ्यूज श्रीलंकेचा सर्वात कमी वयाचा कसोटी कर्णधार झाला होता. त्यापूर्वी मॅथ्यूजने वन डे आणि टी-20 मध्ये श्रीलंकेचं नेतृत्व केलं होतं.
मॅथ्यूजने 34 कसोटी सामन्यांचं नेतृत्व केलं, ज्यापैकी 13 सामन्यात श्रीलंकेला विजय मिळाला, तर 15 सामन्यात पराभव पत्करावा लागला.
मॅथ्यूजच्या नेतृत्वात श्रीलंकेने 47 वन डे सामन्यांमध्ये विजय मिळवला. तर 46 पराभव झाले. टी-20 मध्ये मॅथ्यूजच्या नेतृत्तात श्रीलंकेने चार विजय मिळवले, तर सात पराभव झाले.