कोलकाता : आयपीएलच्या अकराव्या मोसमात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शानदार प्रदर्शन करणाऱ्या आंद्रे रसेलला त्याच्या कामाची पावती मिळाली आहे. जवळपास दीड वर्षांनंतर त्याची वेस्ट इंडिजच्या राष्ट्रीय संघामध्ये निवड करण्यात आली.

वेस्ट इंडिजमध्ये पुढच्या महिन्यात रेस्ट इलेव्हन विरुद्ध होणाऱ्या चॅरिटी टी-20 सामन्यातून त्याने पुनरागमन केलं. डोपिंगचं उल्लंघन केल्यानंतर त्याच्यावर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. या बंदीची शिक्षा संपताच त्याने टी-20 मधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यात यश मिळवलं.

रसेलने 2016 मध्ये भारताविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याच्यावर जागतिक डोपिंगविरोधी एजन्सीने (वाडा) एका वर्षाची बंदी घातली.

रसेलसोबतच अॅश्ले नर्स, ख्रिस गेल, एव्हिन लुईस आणि मार्लोन सॅम्युअल्स यांचाही 13 सदस्यीय संघामध्ये समावेश करण्यात आला. या सर्व खेळाडूंचा पाकिस्तानविरुद्ध खेळवण्यात आलेल्या टी-20 मालिकेत सहभाग होता.

वेस्ट इंडिजमधील चॅरिटी सामना आंतरराष्ट्रीय स्तरावरील असेल, जो 31 मे रोजी लॉर्ड्सवर खेळवला जाईल. इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन वर्ल्ड इलेव्हन संघाचं नेतृत्त्व करणार आहे. एंग्लुईलामधील जेम्स रोलँड पार्क आणि डोमिनिसियाच्या विंस्डर पार्क स्टेडिअमच्या पुनर्निर्माणासाठी निधी जमवणं हे या सामन्याचं उद्दीष्ट आहे. इरमा आणि मारिया या वादळांमुळे या पार्कचं मोठं नुकसान झालं होतं.

वेस्ट इंडिजचा संघ : सॅम्युअल बद्री, कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), रायद एमिरिट, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, एव्हिन लुईस, अॅश्ले नर्स, केमो पॉल, रोवमॅन पॉवेल, दिनेश रामदीन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, मार्लोन सॅम्युअल्स, केस्निक विल्यम