बंगळुरु: इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला धक्का बसला आहे. कारण तुफान फॉर्ममध्ये असलेला मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडू यो-यो चाचणीत अपयशी ठरला आहे. रायुडू यो-यो चाचणीत तंदुरुस्त नसल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळं भारताच्या इंग्लंड दौऱ्यासाठीच्या वन डे संघातून त्याला वगळण्यात येईल.


यंदाच्या आयपीएल मोसमात चेन्नईकडून खेळताना अंबाती रायुडूनं फलंदाज म्हणून लक्षवेधक कामगिरी बजावली होती. पण तोच रायुडू भारतीय संघाच्या यो-यो चाचणीत तंदुरुस्त नसल्याचं आढळून आल्यानं त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

दुसरीकडे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यो-यो चाचणीत तंदुरुस्त असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं आयर्लंड दौऱ्यातल्या दोन्ही ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्ये तो खेळू शकणार आहे.

रायुडू अपयशी

इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या खेळाडूंची शुक्रवारी बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये यो यो फिटनेस चाचणी झाली. सर्वात आधी कर्णधार विराट कोहली, एम एस धोनी आणि भुवनेश्वर कुमार यांची चाचणी झाली.  कोहली, धोनी, भुवनेश्वर, केदार जाधव आणि सुरेश रैना यांनी ही चाचणी यशस्वीरित्या पास केली.

मात्र या चाचणीत रायुडूला अपेक्षित गुण मिळवता आले नाहीत. त्यामुळे तो या चाचणीत अपयशी ठरला.

यो यो चाचणीत अपयशी ठरलेला रायुडू तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यो-यो फिटनेस चाचणीत अपयशी ठरला आहे. त्यामुळे त्याला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीतून बाहेर व्हावं लागलं होतं. तर भारताच्या अ संघातील खेळाडू संजू सॅमसनही या चाचणीत नापास झाल्याने त्यालाही इंग्लंड दौऱ्यावर जाता येणार नाही.

काय आहे यो यो टेस्ट...?

फुटबॉल, रग्बी यांसारख्या खेळांबरोबरच क्रिकेटमध्येही खेळाडूंची तंदुरुस्ती आणि स्टॅमिना पारखण्यासाठी यो यो टेस्ट घेतली जाते. याच कारणामुळे क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांनी ही टेस्ट अनिवार्य केली आहे.

या टेस्टमध्ये 20 मीटर्सच्या अंतरावर दोन कोन्स ठेवले जातात. या दोन कोनमधील अंतर एक बीप वाजल्यानंतर दुसरी बीप वाजायच्या आत पार करून पुन्हा मूळ ठिकाणी यायचं असतं.

ठराविक कालावधीनंतर दोन बीप मधील वेग वाढत जातो. त्यामुळे खेळाडूलाही त्याच वेगानं हे अंतर पार करावं लागतं. ही सर्व प्रक्रिया एका संगणक प्रणालीद्वारे हाताळली जाते. आणि त्यातून येणाऱ्या आकडेवारीतून खेळाडूंचा फिटनेस तपासला जातो. या यो यो टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू अव्वल मानले जातात. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा या टेस्टमध्ये सरासरी स्कोर 21 एवढा आहे.

याआधी पारंपरिक पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या यो यो टेस्टला खास महत्व दिलं जात नव्हतं. 90 च्या दशकात तर मोहम्मद अझरुद्दीन आणि अजय जाडेजा वगळता इतर खेळाडूंची या टेस्टमधील सरासरी आकडेवारी जेमतेम 16.5 एवढीच होती. मात्र विराट कोहलीनं कर्णधारपदाची धुरा हातात घेतल्यानंतर या गोष्टींवर विशेष लक्ष्य दिलं जात आहे. बीसीसीआयनेही मिशन 2019 साठी यो यो टेस्टला विशेष महत्व दिलंय. त्यामुळे येणाऱ्या काळात फिटनेसच्या बाबतीतला हा निकष भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं किती फायदेशीर ठरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

संबंधित बातम्या 

विराट कोहली... फिटनेस... आणि बीप टेस्ट