All England Open Badminton : विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदाकाची कमाई करणाऱ्या लक्ष्य सेन याची विजयी घोडदौड सुरुच आहे. यावेळी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष सेन याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. लक्ष्य सेन याने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या एंडर्स एंटनसनचा 21-16, 21-18 या फरकाने पराभव केला. लक्ष्य सेन याने इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पहिल्यांदाच प्रवेश केला आहे. लक्ष्यचा पुढील सामना लांग एंगस आणि लू गुआंग जू यांच्यातील विजेत्यासोबत होणार आहे. लक्ष्यने आपली विजयी लय कायम राखली असली तरी दुसरीकडे ऑलम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांना पराभवाचा सामना करावा लागला.
आठवड्यात तिसरा मोठा विजय –
लक्ष्यने एका आठवड्यात जगातील अव्वल पाचमध्ये असणाऱ्या तीन शटरचा पराभव केला आहे. जर्मन ओपन स्पर्धेत लक्ष्यने जगातील अव्वल शटलर डेनमार्कच्या विक्टर एक्सेलसन आणि नंबर पाचवर असणाऱ्या इंडोनेशियाच्या एंथोनी गिंटिंग यांचा पराभव केला होता. यूटिलिटा एरीना येथे सुरु असलेल्या स्पर्धेत बुधवारी रात्री लक्ष्यने हमवतन सौरभ वर्माला 21-17, 21-7 ने पराभूत केले होते.
सिंधूचा पुन्हा पराभव
भारताची स्टार शटलर पीव्ही सिंधू हिला लागोपाठ दुसऱ्या स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत जपानच्या सायकी ताकाहाशी हिच्याकडून सिंधूचा पराभव झाला आहे. एक तास सहा मिनिटे रंगलेल्या सामन्यात सिंधूला 19-21, 21-16, 17-21 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला
50 मिनिटात सायनाचा पराभव -
ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत या स्पर्धेत सायना नेहवालला पराभवाचा सामना करावा लागला. सायनाने 215 मध्ये ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली होती. यंदा मात्र सायनाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 50 मिनिटात सायनाचा पराभव झाला. सायनाला जापानच्या यामागुची हिने पराभव केला.
सात्विक, चिराग अंतिम आठमध्ये
सात्विक आणि चिराग शेट्टी यांनी ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम आठमध्ये प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरीच्या सामन्यात त्यांनी अवघ्या 27 मिनिटात विजय मिळवला. त्यांनी जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि मर्विन सिडेल यांचा 21-7, 21-7 अशा फरकाने पराभव केला.