टीम इंडियाचं विजयी करंडकासह फोटो सेशन सुरु असतानाच रहाणेनं अफगाणिस्तानच्या खेळाडूंना पुढे येण्याची विनंती केली. त्यानंतर दोन्ही संघांनी कॅमेरासमोर एकत्रित पोझ दिली. त्यामुळे भारतानं हा सामना तर जिंकलाच पण खिलाडूवृत्तीमुळे अफगाणी खेळाडूंबरोबरच तमाम क्रिकेटरसिकांची मनंही जिंकली.
बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच भारतानं अफगाणिस्तानचा एक डाव आणि 262 धावांनी धुव्वा उडवत विक्रमी विजय साजरा केला. धवन आणि मुरली विजयच्या शतकी खेळींमुळे भारतानं पहिल्या डावात 474 धावा उभारल्या. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जाडेजाच्या फिरकीच्या जोरावर अफगाणिस्तानं अक्षरश: लोटांगण घातलं.
भारतानं अफगाणिस्तानचा पहिला डाव 109 धावांत गुंडाळला. 365 धावांची भली मोठी आघाडी मिळाल्यानंतर टीम इंडियानं अफगाणिस्तानवर फॉलोऑन लादला. पण फॉलोऑननंतर अफगाणिस्तान दुसरा डाव 103 धावांत आटोपला.
एकाच दिवसात दोनवेळा ऑल ऑऊट करण्याची कामगिरी केली. भारताकडून रविंद्र जाडेजानं दोन्ही डावांत मिळून सहा तर अश्विननं पाच फलंदाजांना माघारी धाडलं.