बीड : बाळंतपणासाठी रुग्णालयात एसटीने निघालेली महिला एसटीमध्ये बसमध्येच प्रसूत झाली. मात्र दुर्दैवाने वेळीच वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाला. बीड तालुक्यातील जरुड फाट्यावर काल दुपारी ही घटना घडली.
वर्षा देवकते असे प्रसूती झालेल्या महिलेचं नाव आहे. त्यांना मुलगा झाला होता, मात्र प्रसूतीनंतर काही वेळातच बाळ मुत्यू पावले.
हिवरापाडी येथील वर्षा देवकते या दोन दिवसापूर्वी बीड जिल्हा रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. मात्र रुग्णालयातून सांगितले की, तुम्हाला प्रसूतीसाठी अजून आठ दहा दिवसाचा आवधी आहे. त्यामुळे गुरूवारी दुपारी वर्षा देवकते यांनी सरकारी रुग्णालय बीड येथून सुट्टी देण्यात आली. परंतु काल सकाळी अचानक देवकते यांच्या पोटात दुखू लागल्याने त्या हिवरापाडी-बीड या एसटी बसमधून बीडकडे निघाल्या होत्या. वाटेतच जरुड फाट्यावर प्रसूती झाली. त्यांना मुलगा देखील झाला मात्र प्रसूतीनंतर ते बाळ काही वेळातच दगावले.
प्रसूतीसाठी निघालेल्या या महिलेसाठी जवळच्या व्यक्तींनी ॲम्बुलन्ससाठी संपर्क केला किंवा नाही याची माहिती मात्र अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही.
दरम्यान, वर्षा देवकते यांना आता बीडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.