मुंबई : शिवसेनेत पैशांचा बाजार सुरु आहे का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे शिवसेनेचा विभागप्रमुख पैसे मागत असल्याचा आरोप शिवसेनेच्याच उपविभागप्रमुखाने केला आहे. त्यामुळे स्वबळावर लढण्याचं स्वप्न पाहणारी शिवसेना सध्या आपआपसांत भांडताना दिसत आहे.

मुंबईतील मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातले उपविभाग प्रमुख सतिश शिरोळकर यांनी ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्यावर हा आरोप केला आहे.

ड्रायव्हरच्या पगाराचे पैसै, 'सामना' दैनिकाच्या जाहिरातीचे पैसै, बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पैसे, इतकंच नाही तर पदासाठीही पैसै मागितल्याचा आरोप होत आहे.

सतिश शिरोळकर हे फक्त गेल्या सहा महिन्यापासून उपविभाग प्रमुख पदावर काम करत आहेत. कुठल्याही पदाचा अनुभव नसतानाही डायरेक्ट उपविभागप्रमुख पद दिल्याने चर्चा सुरु झाली होती, त्यात आता या आरोपांमुळे शिवसैनिकही हादरले आहेत.

शिवसेनेत आमदार आणि नगरसेवकांइतकंच विभागप्रमुख हे मोठं पद मानलं जातं. पक्षप्रमुख वारंवार विभागप्रमुखांच्या बैठकांद्वारे मतदारसंघाचा आढावा घेत असतात. त्यामुळे उपविभागप्रमुखाने विभागप्रमुखावर केलेले आरोप हे गंभीर आहेत.

ड्रायव्हरचे पैसै मिळाले, ते पैसै नियमित कसे येतील ते बघ, बाळासाहेब स्मारकांचे पैसै कधी देणार, असे प्रश्न या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतात.



हे सर्व आरोप बॅंक स्टेटमेन्ट आणि ऑडियो क्लिपच्या पुराव्यांच्या माध्यमातून आपण सिद्ध करु शकतो, असं उपविभाग प्रमुख सतिश शिरोळकर म्हणतात. विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांची कारकीर्द नेहमीच चर्चेत राहिली आहे. कधी पालिका निवडणुकीत उमेदवारी देण्यासाठी
पैसै मागितल्याचा त्याच्यावर आरोप झाला, तर कधी महिला पदाधिकाऱ्याबद्दल अश्लिल भाषा वापरली म्हणून एका महिलेनं त्यांच्या कानाखाली वाजवली. पदं वाटपांवरुन काहीच दिवसांपूर्वी त्याच्या विभागात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली होती.

शिवसेनेला स्वबळावर विधानसभा-लोकसभा निवडणुका लढवायच्या असतील, तर अंतर्गत लढायांकडे डोळेझाक करुन चालणार नाही.