अजिंक्य रहाणे याने ट्वीट करुन लोकांना मदतीसाठी आवाहन केले आहे. या ट्वीटमध्ये अजिंक्य म्हणतो की, "आपल्याला माहित असेलच, महाराष्ट्रात सध्या पूरामुळे प्रचंड वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगली येथे विशेष मदतीची गरज आहे. अशा वेळी आपण पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मी मदत करुन माझा खारीचा वाटा उचलतो आहे, आपणसुद्धा जमेल तशी मदत नक्की करा."
दरम्यान, पूरग्रस्तांना सामान्यांपासून मराठी कलाकारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु यात बॉलिवूड कलाकार गायब असल्याची टीका होत आहे. अक्षय कुमार आणि रितेश देशमुख व्यतिरिक्त इतर बॉलिवूड कलाकार मंडळींनी पूरग्रस्तांकडे दुर्लक्ष केले आहे. 'लानत है उनपर, जिनके पास दानत नहीं है,' असं म्हणत महाराष्ट्र चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलिवूड कलाकारांवर टीका केली आहे. एकीकडे मराठी कलाकार राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले. सगळ्यांना मदतीसाठी आवाहन केलं. मात्र त्याचवेळी महाराष्ट्र ही कर्मभूमी असलेल्या हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनी पूरग्रस्तांकडे पाठ फिरवली आहे.