मुंबई : मुंबई लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जात. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करतात. त्यामुळे मुंबई लोकल नेहमीच गर्दीने भरलेली दिसते. याच गर्दीचा फायदा उचलत लोकलमधील प्रवाशांचे सामान चोरणाऱ्या एका टोळीला रेल्वे पोलिसांनी तुरुंगाचा रस्ता दाखवला आहे.


सकाळी कामावर जाण्याची घाई आणि संध्याकाळी घरी जाण्याची लगबग, हा बहुतांश मुंबईकरांच्या दिनक्रमाचा एक प्रमुख भाग आहे. प्रवासासाठी मुंबईकर मुंबई लोकलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. लोकलच्या प्रवासादरम्यान प्रवासी त्यांच्याकडे असलेलं सामान किंवा बॅग लोकलमधील रेकवर ठेवतात.

प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांचा डोळा लागतो तर कधी ते त्यांच्या मोबाइलमध्ये व्यस्त असतात. त्याचवेळी त्यांचं त्यांच्या सामानाकडे दुर्लक्ष होतं. एक टोळी याच संधीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांच्या वस्तूंवर, बॅगेवर डल्ला मारते.

ही टोळी त्यांच्याजवळची रिकामी बॅग रेकवर ठेवून प्रवाशांची बॅग घेऊन पसार होत असे. जर एखाद्याचे लक्ष गेलं तर आपल्याकडून चुकून झालं असे भासवून ते चोर वाचायचे. त्यामुळे ही टोळी 'बॅग एक्सचेंज गँग' म्हणून प्रसिद्ध आहे. या टोळीतील सर्व भामटे हे डी. बी. मार्ग, दोन टाकी येथील फुटपाथवर राहत होते.

लोकांना अनेकदा त्यांची बॅग मिळायची, परंतु ती रिकामी असायची. वारंवार होत असलेल्या या घटनांची दखल रेल्वे पोलिसांनी घेतली. त्यानंतर पोलिसांनी वांद्रे ते गोरेगाव रेल्वेस्थानकांच्या दरम्यान सापळा रचून या टोळीतील चौघांना अटक केली.

दरम्यान पोलिसांनी प्रवाशांना त्यांच्या वस्तूंवर, बॅगेवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. हिंदीमध्ये एक म्हण प्रचलित आहे 'नजर हटी दुर्घटना घटी' त्यामुळे प्रवाशांनी नेहमीच त्यांची नजर स्वतःच्या वस्तूंवर असायलाच हवी.