मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी सोमवारी संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. एकीकडे भारतीय अ संघ इंग्लंड लॉयन्सच्या विरोधात चार दिवसीय सामना खेळत असेल, तर दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघ वन डे मालिका जिंकण्यासाठी रणनीती आखत असेल अशा परिस्थितीत संघाची निवड होणार आहे.

निवडकर्त्यांनी सलामीवीर फलंदाज मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांना अगोदरच इंग्लंडला पाठवलं आहे. दोघांचीही कसोटी संघातील जागा पक्की आहे. मात्र त्यापूर्वी दोघांना सराव सामन्याची गरज आहे. मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे वोरसेस्टरच्या काऊंटी ग्राऊंडमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्ध प्रथम श्रेणी सामना खेळतील.

भारतीय अ संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा चार दिवसीय सामना जिंकून मालिका 1-0 ने जिंकली. कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक ठोकणारा करुण नायर या संघाचं नेतृत्त्व करत आहे. या संघात आता भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयही खेळताना दिसतील.

या दोघांचंही पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्यामुळेच त्यांना पुढे पाठवलं आहे, जेणेकरुन तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळेल. एक ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

रहाणे आणि मुरली विजयला अगोदरच इंग्लंडमध्ये बोलवून घेण्यामागे विराट कोहलीचा तो हेतू आहे, जो त्याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी बोलून दाखवला होता. परदेश दौऱ्याच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळण्याची मागणी त्याने केली होती. विराटच्या या मतावर सीओए प्रमुख विनोद राय यांनी शिक्कामोर्तब केलं आणि रहाणे आणि मुरली विजयला तयारीसाठी अगोदरच पाठवलं.

दरम्यान, भारतीय कसोटी संघाचा नियमित यष्टिरक्षक रिद्धिमान साहा अजूनही फिट झाला नसल्यामुळे बोर्डाने दिनेश कार्तिकला इंग्लंडमध्येच थांबायला सांगितलं असल्याची माहिती आहे. या दौऱ्यात बॅकअप यष्टिरक्षक म्हणून भारतीय अ संघाकडून सध्या इंग्लंडमध्येच खेळत असलेल्या ऋषभ पंतचाही संघात समावेश केला जाऊ शकतो.

संबंधित बातमी :

कसोटी मालिकेसाठी संघ निवडीत राहुल द्रविडचीही मोलाची भूमिका