पुणे : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन गंभीर जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांवर काळाने घाला घातला.

हे कुटुंबीय सँट्रो कारमधून लोणावळ्याला फिरायला आले होते. तर पुण्याहून लोणावळ्याला निघालेल्या स्विफ्ट कारमधील एकाने मोठ्या सख्ख्या भावाला गमावलं.

पुण्यातील जगन्नाथ बहिरट हे मुलगा राजू, सून सोनाली आणि नात जान्हवीसह काल वर्षा विहारासाठी पुण्यातून लोणावळ्याला मुक्कामी आले होते. आज दुपारी एका हॉटेलमध्ये जेवण करून पुण्याला परतू लागले. गाडी मुलगा राजु चालवत होते.

दुसरीकडे स्विफ्ट कारमधून प्रतीक सरोदे हा त्याचा मोठा भाऊ निखिल आणि त्यांचे इतर चार मित्रांसमवेत लोणावळ्याला रविवारची मजा घ्यायला निघाले होते. प्रतिकचा मित्र कृष्णा शिरसाठ हा स्टेअरिंगवर बसला होता.

पुण्यापासून कृष्णाने सुरु केलेला प्रवास गाडीतील सहाही जणांसाठी अतिशय वेगाचाच असावा, अखेर तो कार्लाजवळ आल्यानंतर जीवघेणा ठरला. सुसाट वेगातील त्याच्या गाडीचा अखेर ताबा सुटला आणि गाडी डिव्हाईडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेली.

समोरुन लोणावळ्याहून परतणाऱ्या बहिरट कुटुंबीयांच्या सँट्रो कारवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही गाड्यांच्या समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला. तर बहिरट कुटुंबातील आजोबा, मुलगा, सून आणि नात अशा तीन पिढ्या, तर प्रतिकने त्याचा सख्ख्या मोठा भाऊ निखिल सरोदेला गमावलं.

चालक कृष्णा आणि संजीव खुशावाह यांचाही मृत्यू झाला. कृष्णा ज्या वेगाने गाडी चालवत होता यामुळे केवळ त्याचाच नव्हे, तर इतर सहा जणांचा जीव गेला आणि तिघे आयुष्यभरासाठी आधु झालेत. त्यामुळे या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वाहन चालवताना खबरदारी घेण्याची गरज आहे.