मुंबई: तरुणांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टी ट्वेण्टी क्रिकेटमध्ये, धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने कमाल केली. स्वत: 37 वर्षांचा असलेला धोनी आणि निम्म्यापेक्षा जास्त तिशी पार केलेल्या सीएसकेच्या खेळाडूंनी आयपीएलचं जेतेपद पटकावलं.


धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा आठ विकेट्सने धुव्वा उडवून तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. चेन्नईने याआधी 2010 आणि 2011 साली आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं.

शतकी खेळी करणारा सलामीचा शेन वॉटसन चेन्नईच्या फायनलमधल्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला. त्याने 57 चेंडूंत आठ षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 117 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या फायनलमध्ये शतक झळकावणारा तो दुसरा फलंदाज ठरला. 16 धावा करणाऱ्या अंबाती रायडूने विजयी चौकार ठोकला.

अर्ध्यापेक्षा जास्त संघ तिशी पार

सीएसकेच्या विजयाचं वैशिष्ट्य म्हणजे, धोनीचा संघातील 8 खेळाडूंचं वय हे जवळपास 30 पेक्षा जास्त आहे. स्वत: धोनी 36 वर्ष 11 महिन्यांचा म्हणजेच 37 वर्षांचा आहे. तर फायनलमध्ये धडाकेबाज नाबाद शतक ठोकणारा शेन वॉटसनही धोनीच्याच वयाचा आहे.

धोनी आणि वॉटसन 36 वर्ष 11 महिन्यांचे आहेत. याशिवाय ड्वेन ब्राव्हो 34 वर्ष, ड्युप्लेसी 33 वर्ष, अंबाती रायुडू 32 वर्ष, सुरेश रैना 31 वर्ष, कर्ण शर्मा 30 वर्ष, रवींद्र जाडेजा 29 वर्ष सहा महिने म्हणजेच जवळपास 30 वर्ष, असे चेन्नईचे जवळपास 8 खेळाडू 30 किंवा 30 पेक्षा जास्त वयाचे आहेत.

वय नाही फिटनेस महत्त्वाचा

सामना संपल्यानंतर धोनीला खेळाडूंच्या वयाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर धोनीने वय नव्हे तर फिटनेस महत्त्वाचा असल्याचं सांगितलं.

धोनी म्हणाला, “आपण बऱ्याचदा वयाबद्दल बोलतो. मात्र वय नव्हे तर फिटनेस महत्त्वाचा आहे. रायुडू 33 वर्षांचा आहे, मात्र ते महत्त्वाचं नाही. कोणताही कर्णधार चपळ खेळाडू निवडतो, त्यावेळी तो 19-20 वर्षांचा आहे का हे पाहात नाही. त्यामुळे वय हे फक्त एक आकडा आहे”.

 चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंचं वय

शेन वॉटसन 36 वर्ष 11 महिने (37 वर्ष)

महेंद्रसिंह धोनी 36 वर्ष 11 महिने (37 वर्ष)

ड्वेन ब्राव्हो 34 वर्ष 9 महिने (35 वर्ष)

फॅफ ड्युप्लेसी 33 वर्ष 10 महिने (34 वर्ष)

अंबाती रायुडू 32 वर्ष 9 महिने (33 वर्ष)

सुरेश रैना 31 वर्ष 6 महिने

कर्ण शर्मा 30 वर्ष 7 महिने (31 वर्ष)

रवींद्र जाडेजा 29 वर्ष 6 महिने

शार्दूल ठाकूर 26 वर्ष 7 महिने

दीपक चहर 25 वर्ष 10 महिने (26 वर्ष)

लुंगसनी एन्गडी – 22 वर्ष 2 महिने