ठाणे : ठाण्यात भररस्त्यात देहविक्रय आणि नागरिकांची लूटमार करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. ठाण्याच्या माजिवडा भागात एका तरुणीला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर मनसेने तृतीयपंथीयांना दणका दिला.


ठाण्याच्या माजिवडा भागात नाशिक महामार्गाला लागून पाण्याच्या मोठ्या पाईपलाईन आहेत. या पाईपलाईन लगतच्या झुडुपात तृतीयपंथी देहविक्रय करत असल्याचा आरोप आहे. या तृतीयपंथीयांकडून अनेकदा पायी जाणाऱ्या नागरिकांना लुटण्याचे प्रकारही होतात.

माजिवडा भागात राहणारी एक तरुणी शनिवारी रात्री कामावरुन परत येत असताना तीन-चार तृतीयपंथीयांनी तिला लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबत कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी थातुरमातुर उत्तरं दिल्याचा या तरुणीचा आरोप आहे.

याबाबत तरुणीने मनसेकडे तक्रार केल्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह माजिवडा गाठत या तृतीयपंथीयांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही जण पळून गेले, तर एक तृतीयपंथी मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला.

या तृतीयपंथीयाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोप दिला. यापुढे जर या भागात तृतीयपंथी आढळले तर त्यांना अशाचप्रकारे चोप देण्यात येईल, असा इशारा यावेळी मनसेनं दिला.