अनंतपूर, आंध्र प्रदेश : टोलेजंग आकाशपाळण्यात बसण्याची अनेक जणांना भीती वाटते. उंचावर गेल्यावर ट्रॉली निखळली तर, असे तुमच्या-आमच्या मनात येणार विचार दुर्दैवाने आंध्र प्रदेशात खरे ठरले. आकाशपाळण्याची ट्रॉली कोसळून अनंतपूरमध्ये दहा वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमधल्या एका ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु असलेल्या एका जत्रेत भव्य 'मेरी गो राऊंड' म्हणजेच आकाशपाळणा होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि त्यातही रविवार असल्यामुळे जत्रेत प्रचंड गर्दी होती.

हा पाळणा फिरत असताना अचानक सांधा सुटल्यामुळे ट्रॉली निखळली आणि उंचावरुन काही जण खाली पडले. या अपघाताची दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत.


अपघातात अमृता नावाच्या दहा वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तीन चिमुरड्यांसह सहा जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमी नागरिकांना अनंतपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आकाशपाळण्याचा नट बोल्ट सैल झाल्याचं जत्रेतील काही जणांनी व्हील ऑपरेटरला सांगितलं, मात्र त्याने मद्यपान केल्यामुळे पाळणा सुरुच ठेवला आणि हा अपघात घडला, अशी माहिती आहे.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या हवाली केलं. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.