रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं पदक अगदी थोडक्यात हुकलं. दीपा या पराभवाला धैर्यानं सामोरीही गेली. पण खेलग्राममध्ये परतल्यानंतर तिला स्वत:ला रोखता आलं नाही आणि तिनं स्वत:च्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.

 

स्पर्धेत चौथ्या स्थानी समाधान मानाव्या लागणाऱ्या दीपाचं कांस्य पदक अगदी थोड्या फरकानं हुकलं. त्यामुळे खेलग्राममध्ये पोहचताच दीपा ढसाढसा रडली. तिचे कोच बिश्वेश्वर नंदी यांना देखील स्वत:ला रोखता आलं नाही.

 

कोच नंदी म्हणाले की, 'खेलग्राममध्ये परतल्यानंतर दीपाला सांभाळणं कठीण झालं होतं. अगदी थोड्या फरकानं कांस्यपदक हुकणं ही आमच्यासाठी आयुष्यातील सर्वात खेदजनक गोष्ट आहे.' पराभवनंतरच्या संध्याकाळी दीपा आणि तिचे कोच एकमेकांना धीर देत होते.

 

'मी पृथ्वीवरील सर्वात दुखी कोच आहे आणि ही गोष्ट मला आयुष्यभर बोचत राहिल. एवढ्या कमी अंतरानं पदक गमावणं ही सर्वात बोचणारी गोष्ट आहे.' असं म्हणत कोच नंदी यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं.

 

दीपाला मागे टाकत स्वित्झर्लंडच्या गिलिया स्टेनग्रुबरनं कांस्यपदकाची कमाई केली.