मुंबई : क्रिकेटच्या इतिहासात सहा चेंडूत सहा षटकार ठोकणारे फलंदाज फारच कमी आहेत. भारतीय क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास यात आतापर्यंत दोनच फलंदाजांची नावं होती. पण आता या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे.
सर्वात आधी रवी शास्त्री यांनी हा पराक्रम केला होता. त्यानंतर युवराज सिंहने टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सहा बॉलमध्ये सहा सिक्सरचा वर्षाव केला होता. आता सागर मिश्रा या फलंदाजाने ही कामगिरी केली आहे.
मुंबईकर सागर मिश्रा हा पश्चिम रेल्वेचा फलंदाज आहे. 'टाइम्स शील्ड बी डिव्हिजन' सामन्यादरम्यान पश्चिम रेल्वेतर्फे खेळताना सागर मिश्राने आरसीएफविरुद्ध स्फोटक खेळी केली. फिरकी गोलंदाज तुषार कुमरे सागरच्या या तुफानी खेळाचा बळी ठरला.
बुधवारी या सामन्याचा दुसरा दिवस होता. एरव्ही खालच्या क्रमात फलंदाजी करणारा सागरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या डावखुऱ्या फलंदाजने या संधीचा फायदा उचलला. त्याने पहिल्या 51 धावा 35 चेंडूत केल्या. तर त्यानंतरच्या 11 चेंडूत त्याने 40 धावा ठोकल्या. त्याने अवघ्या 46 चेंडू 91 धावांची तुफानी खेळी रचली. अखेरच्य 11 चेंडूत त्याने 9 उत्तुंग षटका ठोकले. ज्यात त्याने सहा चेंडूत सलग सहा षटकार लगावले आणि त्याचा रवी शास्त्री आणि युवराजच्या यादीत समावेश झाला.
स्वप्न सत्यात उतरलं : सागर
मागील वर्षीच रेल्वेकडून खेळताना वानखेडेमध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सागर मिश्राने सांगितलं की, "मी अष्टपैलू खेळाडू आहे. एरव्ही मी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. विरोधक टीम या क्रमाच्या फलंदाजांसाठी सामान्यत: फिल्डिंग पसरवतात. अशात मी फिल्ड करण्यासाठी प्रॅक्टिस करत आहे.
ही कामगिरी म्हणजे माझं स्वप्न सत्यात उतरल्यासारखं आहे. जेव्हा युवराजने 9 वर्षांपूर्वी स्टुअर्ट ब्रॉडच्या एका ओव्हरमध्ये सहा षटकार ठोकले होते, तेव्हा मी टीव्हीवर पाहिलं होतं. त्यावेळी मी विचारही केला नव्हता की, मी कधी हा पराक्रम करु शकेन."
सहा चेंडूत षटकार ठोकणारे गॅरी सोबर्स पहिले फलंदाज
गॅरी सोबर्स हे किक्रेट इतिहासातील पहिले फलंदाज आहेत, ज्यांनी सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता. 1968 साली फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये इंग्लिश कौंटीत नॉटिंगहमशायर संघाकडून खेळताना ग्लॅमरगॉलविरुद्ध, डावखुरा गोलंदाज मॅकलम नॉशच्या ओव्हरमध्ये त्यांनी ही कामगिरी केली होती.
त्यानंतर 1985 मध्ये भारताच्या रवी शास्त्री यांनी बडोद्याचे फिरकी गोलंदाज तिलकराज यांच्या सहा चेंडूंवर सहा षटकार ठोकून सोबर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.
युवराज सिंहने 9 वर्षांपूर्वी 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार लगावले होते. मात्र युवराजने ही कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केली होती. असा पराक्रम करणार तो भारताचा एकमेव फलंदाज आहे.