सेंट लुसिया : अफगाणिस्तान क्रिकेट टीमच्या राशीद खानच्या प्रभावी गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे खेळाडू अक्षरश: नतमस्तक झाले. 18 धावांच्या बदल्यात 7 विकेट्स घेत राशीदने विक्रमाची नोंद केली. या धडाकेबाज कामगिरीमुळे अफागणिस्तानने वेस्ट इंडिजवर 63 धावांनी विजय मिळवला.
वय वर्षे अवघे 18 असलेल्या लेग स्पीनर राशीद खानच्या तुफान गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना घाम फुटला. वेस्ट इंडीजला पराभवाची धूळ चारत, राशीदच्या गोलंदाजीसमोर गुडघे टेकायला लागले.
वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तानच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय सामन्यांची सेंट लुसियामध्ये कालपासून (शुक्रवार) सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात अफगाणिस्ताने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 213 धावांचं आव्हान ठेवलं.
अफगाणिस्तानचं 213 धावांचं आव्हान पार करण्यासाठी वेस्ट इंडिजने सुरुवात चांगली केली. मात्र, विकेट्सची अशी काही गळती सुरु झाली की, वेस्ट इंडिजचे खेळाडू एकामागोमाग एक परतू लागले. अखेर 44.4 ओव्हरमध्ये 149 धावांवर वेस्ट इंडिजला आपला गाशा गुंडाळावा लागला.
या सामन्यात राशीदने एकूण 7 विकेट्स, तर दौलक जादरानने 2 आणि गुलबदीन नाईबने 1 विकेट घेतली. अफगाणिस्तानने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.