मुंबई : सुकाणू समितीच्या नाशिकमधील बैठकीचा सूर पाहता, मी आंदोलनाचं नेतृत्त्व करावं, असंच सर्वांचं म्हणणं होतं. पण सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा मी तयारी दाखवली. मात्र, अजूनही काहींना आक्षेप असेल, तर मी बाहेर पडायला तयार आहे, अशी रोखठोक भूमिका सुकाणू समितीचे सदस्य खासदार राजू शेट्टी यांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली. शिवाय, तसंही मला या सरकारशी काही देणं-घेणं नाही. मी माझं सरकारविरोधातलं आंदोलन लढतो आहे, असेही ते म्हणाले.
सरकारला आम्ही दोन दिवसांचा अवधी दिला होता. अन्यथा आम्ही आंदोलनाची तीव्रता वाढवू असा इशाराही दिला होता, असे राजू शेट्टींनी सांगितले. त्याचसोबत, “सरकारकडून निमंत्रण आल्याचं मला माहिती नाही. शनिवारी सुकाणू समितीची बैठक आणि रविवारी सरकारसोबत बैठक आहे. त्यावेळी आम्ही आमची भूमिका मांडू. मात्र, त्याआधी समितीतल्या काही लोकांनी घाई गडबडीत भूमिका मांडणं चुकीचं आहे.”, असेही ते म्हणाले.
“माझ्याकडे सूत्र आणि अजित नवलेंकडे समन्वयक पदाची दबाबदारी दिली आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेवा. मात्र, तरीही इतरांना जर चर्चेला जायचंच असेल, तर मी माझं नाव मागे घ्यायला तयार आहे.”, असेही राजू शेट्टींनी सांगितले.
“आधी बैठकीत मी सगळ्यांची मतं जाणून घेऊन मगच मी माझं समन्वयाबद्दलच्या मतभेदावर मत मांडेन. तरी मी राजकीय पक्षाचा आहे म्हणून जर यांचा मला विरोध असेल तर एक लक्षात घ्या की मला या सरकारशी काही देणं-घेणं नाही. मी माझं सरकारविरोधातलं आंदोलन लढतो आहे.”, असेही राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.