मुंबई : भारतातल्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल्स कंपन्यांपैकी एक असणाऱ्या ‘टाटा मोटर्स’मधल्या अधिकाऱ्यांची सर्व पदं रद्द करण्यात आली आहेत. कंपनीत यापुढं कोणीही बॉस नसेल, सर्व कर्मचारी म्हणूनच काम करतील.
टीम वर्कला वाव मिळावा आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी, या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळं सर्व कर्मचारी एकाच स्तरावर येतील.
कुठल्याही विभागात मॅनेजर वगैरे पद नसेल. फक्त टीम हेडची नियुक्ती असेल. म्हणजेच टीमच्या लीडरला फक्त हेड म्हटलं जाईल. बाकी सर्व कर्मचारीच असतील.
कोणती पदं रद्द होणार आणि कोणती पदं कायम राहणार?
जनरल मॅनेजर, सिनियर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, व्हॉईस प्रेसिडंट, सिनियर व्हॉईस प्रेसिडंट यांसारखे महत्त्वाची पदं रद्द करण्यात येणार आहेत. मात्र, मॅनेजिंग डायरेक्टर, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि टीम लीडर यांसारखे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असलेली पदं कायम ठेवली जाणार आहेत.
टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या सुमारे 10 हजार कर्मचाऱ्यांशी संबंधित हा निर्णय आहे. त्यामुळे कंपनीत अशा प्रकारचा मोठा निर्णय घेतल्याने आश्चर्य आणि आनंदही व्यक्त केला जात आहे.
टाटा मोटर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. शिवाय, या निर्णयामुळे जागतिक सेवा क्षेत्रातल्या कंपन्यांची संस्कृती भारतातही रुजू होण्यास सुरुवात होईल.